पानसरे दाम्पत्याच्या रक्ताचे कपडे साक्षीदारांनी ओळखले; कॉ. गोविंद पानसरे हत्याकांड खटला

भाकपचे ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावरील गोळीबारानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथे पोलिसांनी दोघांचे रक्ताने माखलेले कपडे ताब्यात घेतले होते. न्यायालयात आज साक्षीदारांनी हे कपडे ओळखले आहेत.

कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयात कॉ. गोविंद पानसरे हत्याकांडाच्या खटल्याचे कामकाज सुरू असताना संशयितांच्या वकिलांनी आज साक्षीदारांची उलटतपासणी केली. दोन्ही बाजूंच्या वकिलांच्या आरोप-प्रत्यारोपांतून खडाजंगी झाली. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्यासमोर दोन साक्षीदारांच्या साक्षी आणि त्यांची उलटतपासणी झाली. पुढील सुनावणी 3 एप्रिल रोजी होणार आहे.

कॉ. पानसरे दाम्पत्यावर 16 फेब्रुवारी 2015 रोजी प्रतिभानगर येथे त्यांच्या राहत्या घरापासून काही अंतरावर गोळीबार झाला होता.जखमी अवस्थेत त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. पोलिसांनी जखमींचे कपडे जप्त केले होते. त्या वेळचे पंच इम्तियाज नूरमहंमद हकीम (वय 47, रा. गोळीबार मैदान, कसबा बावडा, कोल्हापूर) आणि सादिक सिराज मुल्ला (वय 42, रा. सुभाषनगर, सिरत मोहल्ला, कोल्हापूर) या दोघांची साक्ष विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी घेतली. यावेळी न्यायालयात दाखविण्यात आलेले पानसरे दाम्पत्याच्या रक्ताने माखलेले कपडे ओळखत असल्याचे दोन्ही साक्षीदारांनी सांगितले. साक्षीदारांनी पंचनाम्याचा घटनाक्रमही सांगितला.

त्यानंतर आरोपींचे वकील समीर पटवर्धन, वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अमोघवर्ष खेमलापुरे यांनी साक्षीदारांची उलटतपासणी घेतली. साक्षीदारांची नावे, पंचनाम्यातील गुंतागुंत असे अनेक कठीण प्रश्न विचारून त्यांनी साक्षीदारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकी पावणेदोन तास या दोन साक्षीदारांची साक्ष आणि उलटतपासणी सुरू झाली. सरकारी पक्षामार्फत विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर आणि शिवाजी राणे यांनी कामकाज पाहिले.

सुनावणीसाठी गुह्यातील सर्व 10 संशयित न्यायालयात हजर केले होते. संशयित आरोपी गणेश मिस्कीन आणि अमित बद्दी या दोघांना केवळ कन्नड भाषा समजते. त्यामुळे न्यायालयातील कामकाजाची त्यांना माहिती समजावी, यासाठी दुभाषक ऍड. एन. जी. कुलकर्णी यांची नियुक्ती केली होती.

पानसरे, कलबुर्गी आणि दाभोलकर खून खटल्यातील आरोपी

संशयित आरोपींना खटल्याच्या कामासाठी वेळेत न्यायालयात हजर ठेवता यावे, यासाठी पोलिसांनी सोमवारी रात्रीच त्यांना येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहात ठेवले. आज सुनावणी झाल्यानंतर पुन्हा कारागृहात ठेवले जाणार आहे. बुधवारी त्यांना बंगळुरू व पुण्याला पाठविले जाणार आहे. डॉ. कलबुर्गी खुनाच्या गुह्यात आठजण बंगळुरू कारागृहात आहेत, तर चारजण डॉ. दाभोलकर खून खटल्यात येरवडा कारागृहात आहेत.