अपघातात कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्यांसाठी ठोस मदतीचा प्रस्ताव

सामना ऑनलाईन, मुंबई

रस्ते अपघातातील कायमचे अपंगत्व आलेल्यांना अपघात दावा प्राधिकरणाकडून नुकसानभरपाई मिळते; पण आयुष्यभर या व्यक्तींना आर्थिक आधाराची गरज लागते. हे लक्षात घेता अशा व्यक्तींना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी परिवहन विभागाकडून ठोस आर्थिक स्वरूपाच्या पर्यायाचा गांभीर्याने विचार सुरू असल्याचे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मंगळवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात पार पडलेल्या रस्ते सुरक्षा कार्यशाळेत केले. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग आणि परिवहन विभागातर्फे संयुक्तपणे कार्यशाळा घेण्यात आली.

परिवहन विभाग दोन वर्षांत अद्ययावत होण्यासाठी विविध उपक्रम राबवीत आहेत. त्यातून राज्यातील सर्व आरटीओमध्ये कम्प्युटराइज्ड ड्रायव्हिंग टेस्ट आणि वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेटची यंत्रणा कार्यान्वित होणार असल्याचे परिवहन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सादरीकरणात स्पष्ट केले. अपघातांची संख्या ५० टक्क्यांनी कमी करण्याचे आव्हान मोठे असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे विभागाच्या आधुनिकीकरणात राज्यातील पाच कोटी वाहनचालकांचे अभिलेख कम्प्युटराइज्ड प्रणालीत आणण्याचेही मोठे काम हाती घेण्यात आले आहे. अपघातांच्या संख्येत घट करण्यासाठीही विविध पद्धतीने प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मद्यपान केले असल्यास बस सुरू होणार नाही!
बस सुरू करण्यापूर्वी चालकाने मद्यप्राशन केले असल्यास ती बस जागीच थांबणारे तंत्र आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी विकसित केले आहे. त्याचाही वापर करण्याची योजना असल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी यावेळी सांगितले. रस्ते अपघातात महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा असून १५ ते ४९ वर्षे वयोगटातील अपघाती मृत्यूंची संख्येत राज्य चौथ्या क्रमांकावर येते. गेल्या वर्षी राज्यात एकूण ३९,८४८ अपघात झाले. त्यात १२,८८३ व्यक्ती मृत्युमुखी पडल्या, तर ३५,८९४ व्यक्ती जखमी झाल्या. संयुक्त राष्ट्रसंघाने २०२० पर्यंत विकसनशील देशांमध्ये रस्ते अपघातांच्या संख्येत ५० टक्के घट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

वेगवान गाड्यांवर स्पीड कॅमेऱयाची नजर
वेगवान गाड्यांवर निर्बंध आणण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी स्पीड कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ईस्टर्न एक्स्प्रेसवे आणि सी लिंकवरील वेगवान वाहनांवर नजर ठेवणाऱया २० स्पीड कॅमेऱ्यांपाठोपाठ आणखी ४० स्पीड कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. मुंबई महापालिकेच्या सहाय्याने दीड महिन्यात हे कॅमेरे बसवण्यात येतील. मरीन ड्राईव्ह पश्चिम द्रूतगती मार्ग, बीकेसी, पूर्व द्रूतगती मार्गावर हे कॅमेरे बसविण्यात येतील, असे सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या