गोविंदा रे गोपाळा… मुंबईत सराव शिबिरांचा थरार

‘गोविंदा रे गोपाळा’, ‘बोल बजरंग बली की जय’ म्हणत गोकुळाष्टमीला उंचच उंच दहीहंडी फोडण्यासाठी मुंबई, ठाण्यातील गोविंदा पथके महिनाभर सराव करतात. याची रंगीत तालीम म्हणून ठिकठिकाणी सराव शिबिरांचे आयोजन केले जाते. यानिमित्ताने गोविंदा पथक थरावर थर रचून बक्षिसांची लयलूट करताना दिसत आहेत.

गोविंदांचा उपवास सुटणार खास मेजवानीने!

लालबाग विभागातील सर्व गोविंदा पथकांकरिता श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास सोडण्याची व्यवस्था करण्याचा आगळावेगळा सांस्कृतिक उपक्रम शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख श्रीधर ऊर्फ काका कदम यांनी हाती घेतला आहे. चिंचपोकळीतील दत्ताराम लाड मार्गावर तांबावाला बिल्डिंग येथील गुड होप चेंबर प्रांगणात या सांस्कृतिक उत्सवाचे आयोजन केले आहे.

विभागातील सर्वच गोविंदा पथकांना या उत्सवाकरिता निमंत्रित करण्यात येणार आहे. मध्यरात्री 12 नंतर मंडळाची मानाची हंडी फोडून झाल्यावर सर्व गोविंदा पथकांनी या ठिकाणी येऊन पाच थराची हंडी फोडून सलामी द्यायची आहे. त्यानंतर गोविंदा पथकांना येथे पारंपरिक आंबोळी, काळ्या वाटाण्याचे सांबार, शेवग्याची भाजी, चटणी अशा चविष्ट भोजनाचा आस्वाद घेता येणार आहे. ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’चे अध्यक्ष विठ्ठलदास पै, रोहन मेहेर, राजन पार्टे, अनिल काडगे, रोहन काडगे, सुनील राऊळ, देवेन पराडकर, नारायण मसुरकर, विजय राणे, राजा परब, दिनेश परब, अनिकेत परब, अनिल परब आदी हा अभिनव उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

आयडियलची पर्यावरणपूरक दहीहंडी

दादरच्या आयडियल येथील दहीहंडी उत्सवात यंदा महिला अत्याचाराविरोधातील देखावा दाखवला जाईल. साईदत्त मित्र मंडळ, बाबू शेठ पवार व मित्र मंडळ आणि आयडियल दादरतर्फे आयोजित या पर्यावरणपूरक दहीहंडी उत्सवात दरवर्षी मोठ्या प्रमाणात महिला आणि पुरुष गोविंदा पथक हजेरी लावतात. यंदाचे आकर्षण म्हणजे दिव्यांग व अंधांच्या गोविंदा पथकांचाही सहभाग असणार आहे. मालाड पूर्व येथील शिवसागर गोविंदा पथक महिला अत्याचाराविरोधातील आणि शिवकालीन मावळ्यांच्या इतिहासावरील देखावा सादर करतील.

शिवसेना उत्तर भारतीय एकता मंचतर्फे दहीहंडी सराव शिबीर कांदिवली पूर्व येथील हनुमान नगर महिंद्रा यलो गेट येथे आयोजित केले होते. 38 गोविंदा पथकांनी सराव शिबिरात सलामी दिली. प्रत्येक गोविंदा पथकाला शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर, युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू, नगरसेविका माधुरी भोईर, शाखा समन्वयक नंदिनी मसुरकर, उपविभागप्रमुख योगेश भोईर, अजंता यादव, नंदू मोरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन प्रवक्ते अभिषेक उपाध्याय, उपविभागप्रमुख प्रशांत कोकणे, विधानसभा समन्वयक मनोज मसुरकर, शाखाप्रमुख धनाजी ठाकूर, शाखा समन्वयक विशाल शेवाळे यांच्यातर्फे करण्यात आले होते.

दिंडोशीची मानाची दहीहंडी

शिवसेना नेते, आमदार सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना दिंडोशी विधानसभा आणि कल्पतरू युवा प्रतिष्ठानच्या वतीने मंगळवार, 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 ते रात्री 10 या वेळेत मालाड पूर्व कुरार गाव येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानात दिंडोशीची मानाची दहीहंडी उत्सव साजरा करणार येणार आहे. 5 लाख 55 हजार 555 रुपयांचे रोख बक्षीस विजेत्यांना मिळणार आहे. सिने कलाकारांच्या उपस्थितीत मराठी आणि हिंदी गीतांचा बहारदार नजराणा यावेळी सादर होईल.