‘एसबीआय’मुळे एटीएममध्ये खडखडाट! आरबीआयकडे तक्रार, 100 कोटींची नुकसानभरपाईची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरात स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) चे 65 हजार एटीएमचे नेटवर्क आहे. यापैकी 50 टक्क्यांहून अधिक एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम बँकेकडून केले जात असून सध्या मोठी शहरे वगळता टिअर-2 आणि टिअर-3 मधील शहरांतील एटीएममध्ये पुरेशा नोटा उपलब्ध होत नाहीत, अशी तक्रार एटीएम उद्योगातील कॉन्फेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पाठवली आहे.

एटीएममध्ये कॅशचा तुटवडा होत असल्याने अनेक एटीएम बंद पडले आहेत. यामुळे एटीएम ऑपरेटर्सला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. एटीएम बंद राहिल्याने ऑपरेटर्सला ट्रान्झॅक्शन आणि इंटरचेंज फीचे नुकसान सहन करावे लागत आहे. नुकसान भरून काढण्यासाठी बँकिंग उद्योगांनी 100 कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीसुद्धा संघटनेने आरबीआयला पाठवलेल्या पत्रात केली आहे. छोटय़ा शहरात आणि ग्रामीण भागातील एटीएममध्ये पैसे पाठवले जात नाहीत, असा आरोप संघटनेने केला आहे. 20 जूनपर्यंत ही समस्या सोडवावी, अशी विनंतीही संघटनेने केली आहे.

एचडीएफसी बँकेचा ग्राहकांना झटका

एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे. बँकेने वेगवेगळ्या कालावधीसाठी एमसीएलआरमध्ये 5 ते 10 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. बँकेचे एमसीएलआर दर आता 8.05 टक्क्यांवरून 8.65 टक्क्यांपर्यंत वाढवले आहेत. 1 वर्षाचे कर्ज 8.35 टक्क्यांवरून 8.40 टक्क्यांपर्यंत, 3 वर्षांचे कर्ज 8.60 टक्क्यांवरून 8.65 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. बँकेने दोन वर्षांच्या कर्जांमध्ये 10 बेसिस पॉइंट्सची थेट वाढ केली आहे.