भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी केली राहुल गांधींची स्तुती; वरिष्ठांनी झापल्यानंतर केलं टीका करणारं ट्विट?

rahul-gandhi-uk

काँग्रेस नेते राहुल गांधी त्यांच्या परदेशातील भाषणांवरून सध्या चर्चेत आहेत. एकीकडे भाजपकडून ही भाषणं लक्ष्य केली जात असतानाच नागालँड भाजपचे प्रदेशाध्यक्ष तेमजेन इमना अलोंग यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या यूके दौऱ्यावरील फोटोवर कमेंटकरून कौतुक केलं आहे.

नागालँडमधील आदिवासी व्यवहार मंत्र्यांनी ट्विटरवर काँग्रेस नेत्याचे कौतुक केले. राहुल गांधी सध्या यूकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यासाठी राहुल गांधी यांनी लूक बदलला आहे. ट्रीम दाढी आणि सुटाबुटातील फोटो काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट करण्यात आला आहे. अनेक यूझर्सनी त्यांना ‘पीएम मटेरियल’ म्हणून संबोधले आहे. तर काहींनी टीका देखील केली आहे.

अलोंग यांनी राहुल गांधींचा आत्मविश्वास आणि फोटोसाठी दिलेल्या पौझचं कौतुक केलं आहे.

सोबत लिहिले आहे की, ‘मानावं लागेल, फोटो तर छान आला आहे, आत्मविश्वास आणि पोजही नेक्स्ट लेवल आहे.’

भाजपच्या प्रदेशाध्यक्षांची ही पोस्ट अशा वेळी आली आहे जेव्हा भाजपकडून राहुल गांधींवर चौफेर टीका होत आहे.

दोन दिवसांपूर्वी, लंडनमध्ये ब्रिटीश संसद सदस्यांना संबोधित करताना, काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, देशात विरोधी पक्षांना अनेकदा गप्प केलं जातं आणि खासदार होणं सोपं नव्हतं. गांधींनी देशातील लोकशाहीचे प्रश्न सोडवण्यासाठी परकीय हस्तक्षेपाचीही मागणी केली, परंतु नंतर ते म्हणाले की, ‘त्या अंतर्गत समस्या आहेत आणि त्यांना अंतर्गत उपाय आवश्यक आहेत’.

कमेंट व्हायरल झाल्यानंतर टाकील टीका करणारी पोस्ट

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्षांच्या या कमेंटच्या बातम्या झाल्या. त्यांनंतर त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर राहुल गांधींवर टीका करणारी पोस्ट टाकली आहे. त्यात त्यांनी कॅप्शन चोरल्याचा आरोप केला आहे. कॅप्शन तरी स्वत:ची टाकत चला, असा सल्लाही दिला आहे. कमेंट व्हारयल झाली, देशभरात त्यांच्या बातम्या होऊ लागल्यानंतर भाजपच्या वरिष्ठांनी त्यांना झापल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर त्यांनी तब्बल 14 तासांनी आपल्या ट्विटर हँडलवरून राहुल गांधी यांच्यावर टीका करणारं ट्विट केल्याची चर्चा आहे.