
क्रिकेटच्या मैदानात जसा विक्रमांचा पाऊस पडतो तशा काही मजेशीर गोष्टीही घडतात. अनेकदा धावण्याच्या नादात दोन्ही फलंदाज एकाच बाजूला जातात किंवा धावपट्टीच्या मध्येच एकमेकांना धडकतात. असाच काहीसा प्रकार पाकिस्तानमध्ये धडला आहे.
मुलतानच्या मैदानावर पाकिस्तान आणि बांगलादेशच्या अंडर-19 संघात कसोटी सामना सुरू आहे. या लढतीत बांगलादेशच्या खेळाडूंनी पाकिस्तानी फलंदाजाला धावबाद करण्याची संधी गमावली. मात्र फलंदाजांच्या या गोंधळादरम्यान बांगलादेशच्या यष्टीरक्षकानेच दोन धावांएवढे अंतर पळून काढले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
तीन आठवड्यांपूर्वी घडलेल्या हा प्रकार सध्या चर्चेचा विषय ठऱला आहे. मुलतानच्या मैदानावर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या पाकिस्तानच्या संघातील फलंदाजाने कव्हरला एक फटका मारला. चेंडू क्षेत्ररक्षकापासून थोडा लांब असल्याचे पाहताच फलंदाजाने चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र खेळपट्टीच्या मध्यभागी येऊन तो थांबला आणि माघारी फिरला. दुसरीकडे नॉनस्टाईकला उभा असणारा फलंदाज बॅटिंग एंडला पोहोचला. एका क्षणाला दोन्ही फलंदाज एकाच बाजूला उभे होते.
पाकिस्तानचे दोन्ही फलंदाज धाव काढताना गोंधळल्याचे लक्षात येताच यष्टीरक्षक आणि बांगलादेशचा कॅप्टन साहीम हुसैन दिपू याने चपळाईने बॉलिंग एंडला धाव घेतली आणि फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्न केला. परंतु क्षेत्ररक्षकाने बॉलिंग एंडला चेंडू फेकण्याऐवजी बॅटिंग एंडला चेंडू फेकला. त्यामुळे यष्टीरक्षकाने पुन्हा बॅटिंग एंडला धाव घेतली. हा सारा गोंधळ कॅमेऱ्यात कैद झाला असून याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शेअर करत नेटकरीही मजा लुटत आहेत.
The wicket keeper completed two runs😂
— Divyanshu Adarsh Mund (@adi_h_d) November 25, 2022