काँग्रेसला 2014 मध्ये सत्ता स्थापनेचा प्रस्ताव कुणी दिला त्यांची नावे जाहीर करा, शिवसेनेचे काँग्रेसच्या नेत्यांना आवाहन

anil-parab

राज्यात 2014 मध्ये शिवसेना व राष्ट्रवादीने सत्ता स्थापनेचा प्रस्ताव काँग्रेसला दिला होता, असा दावा काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. मात्र शिवसेना, राष्ट्रवादीने हा दावा फेटाळून लावला आहे. शिवसेना प्रवक्ते व परिवहन मंत्री अनिल परब यांनी काँग्रेसला प्रस्ताव देणाऱ्यांची नावे जाहीर करावीत, असे आवाहन चव्हाण यांना केले आहे.

2014 मध्ये राज्यात विशिष्ट राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती. त्या वेळी भाजपला रोखण्यासाठी आघाडी सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने शिवसेना आणि राष्ट्रवादीने माझ्याशी संपर्क साधला. त्या वेळी त्यांचा प्रस्ताव आपण फेटाळून लावला होता, असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी, असा कोणताही प्रस्ताव काँग्रेस किंवा शिवसेनेला दिला नव्हता, असे स्पष्ट केले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चव्हाण यांचे विधान आश्चर्यकारक असल्याचे म्हटले आहे.

पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
2014 मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझ्याशी संपर्क साधला होता. मात्र तसा प्रस्ताव आल्यानंतर लगेचच तो आपण फेटाळला. राजकारणात जय-पराजय होत असतातच. आम्ही निकडणूक हरल्याने विरोधात बसणार हे त्या वेळी स्पष्ट केले होते. आताही शिवसेनेसोबत सत्ता स्थापण्यास काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उत्सुक नव्हत्या, मात्र चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर त्यांनी अनुकूल भूमिका घेतली, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

नावे उघड करा – अनिल परब
काँग्रेसला कोणी प्रस्ताव दिला आणि कशासाठी दिला याबाबत आम्हाला माहिती नाही. पृथ्वीराज चव्हाण ज्या प्रस्तावाबाबत बोलले ते त्यांनाच माहीत असावे. त्यामुळे त्यांच्याशी कुणी चर्चा केली, चर्चेसाठी कोण उपस्थित होते त्यांची नावे काँग्रेसने उघड करावीत, असे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या