जम्मू आणि कश्मीरमधील विधानसभा निवडणूक एकत्र लढवण्यावर काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने आज शिक्कामोर्तब केले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे ही आघाडी जुळवून आणण्यासाठी बुधवारी संध्याकाळी श्रीनगर येथे दाखल झाले होते. नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी त्यांनी आज अब्दुल्ला व इतर नेत्यांशी चर्चा केल्यावर दोन्ही पक्षांच्या आघाडीची ही घोषणा करण्यात आली.
राज्यातील सर्व 90 जागा आघाडी एकत्रितपणे लढेल, जागावाटपाचे नंतर ठरवले जाईल. सर्व चित्र पहिल्या टप्प्यापूर्वी समोर येईल, असे ते म्हणाले.
इंडिया–काँग्रेसमुळे मोदींनी आत्मविश्वास गमावला
या राज्याशी माझे रक्ताचे नाते आहे. इथले आमचे कार्यकर्ते सिंहासारखे आहेत, मी तुमचा दिल्लीतील प्रतिनिधी आहे, माझे दरवाजे तुमच्यासाठी नेहमीच खुले असतील, असा संवाद साधत राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना उमेद दिली. लोकसभा निवडणुकीत आपल्या कामगिरीमुळे पंतप्रधान मोदींनी आत्मविश्वास गमावला आहे. आता त्यांची छाती 56 इंच रुंद राहिलेली नाही. ते खांदे पाडून चालतात, असे ते म्हणाले. जम्मू-कश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा मिळवून देणे याला इंडिया आघाडीचे प्राधान्य असेल, असेही त्यांनी सांगितले. काँग्रेस देशभरात भाजपला आव्हान देत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.