काँग्रेसचा महाअधिवेशनात ठराव, ‘ईव्हीएम’ नको, ‘बॅलेट पेपर’नेच मतदान घ्या!

61
printed-receipt-evm

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मतदानासाठी ‘ईव्हीएम’ नको. यापुढे बॅलेट पेपरचा वापर केला पाहिजे अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या ८४व्या महाअधिवेशनात आज करण्यात आली. तसेच २०१९ च्या निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी समविचारी पक्षांबरोबर आघाडी करण्याचे संकेतही यावेळी काँग्रेसने दिले.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या ८४ व्या दोनदिवसीय महाअधिवेशनाला आज सुरुवात झाली. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह पक्षाचे अनेक नेते, प्रदेशाध्यक्ष, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. आज अधिवेशनात विविध ठराव मंजूर करण्यात आले.

मोदी सरकार ड्रामेबाज! सोनिया गांधींचे टीकास्त्र
‘सबका साथ, सबका विकास,’ ‘ना मैं खाऊंगा, ना खाने दुंगा’ या केवळ केंद्रातील मोदी सरकारच्या घोषणा आहेत. प्रत्यक्षात मोदी सरकार ड्रामेबाज, अहंकारी आणि सत्तेसाठी हपापले आहे. या सरकारला सत्तेची नशा चढलीय अशा शब्दांत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हल्लाबोल केला. काँग्रेस पक्षाने देशहितासाठी मनरेगा, वन अधिकार, भूमि अधिग्रहण, माध्यन्ह भोजन, शिक्षण, आरोग्य अशा विविध योजना सुरू केल्या. मात्र, या योजना उद्ध्वस्त करण्याचे काम मोदी सरकार करीत आहे.

या सरकारला सत्तेची नशा चढली आहे. सत्तेच्या अहंकारापुढे काँग्रेस पक्ष कधीच झुकणार नाही असे सोनिया गांधींनी सांगितले. विरोधकांवर बोगस गुन्हे दाखल करणे आणि मीडियाला त्रास देण्याचे काम हुकूमशहा मोदी सरकार करीत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. मोदी सरकार अहंकारी आणि सत्तेसाठी हपापलेले आहे. गेल्या चार वर्षात काँग्रेसला संपविण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले. साम, दाम, दंड, भेदचा वापर हे सरकार करीत आहे, असे त्या म्हणाल्या.

काँग्रेसने मंजूर केलेले ठराव
जनमताच्या कौलमध्ये हेराफेरी करण्यासाठी ‘ईव्हीएम’चा दुरुपयोग केला जात आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने यापुढील निवडणुकांत ‘ईव्हीएम’चा वापर बंद करावा, ‘बॅलेट पेपर’चा वापर मतदानासाठी सुरू केला पाहिजे. लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याचा प्रस्ताव म्हणजे ‘भाजपची खेळी’ आहे. या प्रस्तावावर देशव्यापी एकमत होणे गरजेचे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या