राजीनाम्याची सुरुवात राहुल गांधी यांनीच केली: राजनाथ सिंह यांचा पलटवार

32

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

कर्नाटकातील काँग्रेस- जेडीएस सरकार संकटात असल्याचा मुद्दा सोमवारी लोकसभेतही उपस्थित करण्यात आला होता. भाजप कर्नाटकातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केला. कर्नाटकात घडत असलेल्या राजकीय घडामोडींमागे भाजपचा हात नसल्याचे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. तसेच राजीनामा देण्याची सुरुवात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीच केली आहे, असा टोलाही त्यांनी राहुल यांना लगावला.

भाजप कर्नाटकातील काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करत असून ही लोकशाहीची हत्या आहे, असा आरोप काँग्रेसच्या चौधरी यांनी केला. कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यात काँग्रेसचे सरकार आहे. या राज्यात आमदारांना फोडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भाजप काँग्रेसचे सरकार पाडण्याचा कट रचत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावर कर्नाटकातील राजकीय घडामोडींमागे भाजपचा हात नसल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. कोणत्याही आमदारांना आमिष दाखवून पक्षात घेण्याची आमची परंपरा नाही. लोकशाही तत्व जोपासण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. कर्नाटकातील घडामोडींवरून त्यांनी राहुल गांधी यांनाही टोला लगावला. राजीनामा देण्याची सुरुवात आम्ही केलेली नाही. राजीनामा देण्याची सुरुवात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीच सुरू केली आहे. त्यानंतर काँग्रेसमध्ये राजीनाम्यांचे सत्र सुरू झाले. अनेक ज्येष्ठ नेते, आमदार राजीनामा देत आहे. हे सत्र अजूनही सुरूच आहे. या घटनांशी भाजपचा काहीही संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या