मोदींचा धसका घेतलेल्या काँग्रेसची नवी खेळी, पंतप्रधानपदावर पाणी सोडण्याची तयारी

157

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर आले तर आपले काही खरे नाही या भीतीने ग्रासलेल्या काँग्रेसने आता एनडीएला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पंतप्रधानपदावरही पाणी सोडण्याची तयारी दर्शवली आहे. लोकसभा निवडणूक निकालानंतर त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास आम्ही मोदींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पंतप्रधानपदावरचा दावाही सोडू असे जेष्ठ काँग्रेसनेते गुलाम नबी आझाद यांनी स्पष्ट केले आहे.

काँग्रेसच्या बाजूने सर्व मित्र पक्ष उभे राहत असतील आणि संयुक्त पुरोगामी आघाडीला(युपीए ) सत्तेवर येण्याइतपत बहुमत मिळत असेल तर आम्ही देशाचे नेतृत्व करायला तयार आहोत.हे आम्ही आधीच स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए ) सत्तेपासून दूर ठेवणे हे आमचे प्रमुख लक्ष्य असेल.त्यामुळे आघाडीत बहुमताने जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल असे आझाद यांनी सांगितले.

निकालाआधीच काँग्रेसने हाय खाल्ली

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला चांगले यश मिळणार नाही या भीतीने काँग्रेसला ग्रासले आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा सत्तेवर येण्यापासून रोखण्यासाठी पंतप्रधानपद नाही मिळाले तरी चालेल अशी तयारी काँग्रेसने ठेवली आहे. त्यामुळे निकालाआधीच काँग्रेसने हाय खाल्ल्याचे मत राजकीय तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांचे वक्तव्य हे अपयशी मानसिकतेचेच लक्षण असल्याचे बोलले जात आहे.

लोकसभा निवडणूक जिंकण्याचा विश्वास विरोधकांना वाटत असेल तर त्यांनी आधी पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करावा.

– राजनाथ सिंह ,केंद्रीय गृहमंत्री

जोपर्यंत आम्हाला पंतप्रधानपदाची ऑफर दिली जात नाही तोपर्यंत आम्ही त्यावर काहीच बोलणार नाही,एनडीएला सत्ता मिळू नये यासाठी आम्ही सरकारचे नेतृत्व अन्य मित्र पक्षाकडे सोपवायला तयार
आहोत.

– गुलाम नबी आझाद ,जेष्ठ काँग्रेस नेते

आपली प्रतिक्रिया द्या