काँग्रेसचे चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले. ते 48 वर्षांचे होते. मागील तीन दिवसांपासून ते दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचार घेत होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यापूर्वी त्यांच्यावर किडनीसंबंधी आजारासाठी नागपूर येथे उपचार सुरू होते. मात्र प्रकृती खालावत गेल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांना एअर एम्ब्युलन्सने दिल्ली येथे हलवण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. बाळू धानोरकर हे काँग्रेसचे चंद्रपूरचे खासदार होते. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे त्यांचे मूळ गाव. वरोरा इथे आज सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कालपासून ते उपचाराला प्रतिसाद देत असल्याची माहिती मिळत होती. मात्र रात्री सव्वादोन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर आणि दोन मुलं असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव दुपारी 12 वाजेपर्यंत वरोरा येथे आणले जाण्याची शक्यता आहे. चार दिवसांपूर्वीच त्यांचे वडील नारायण धानोरकर यांचे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी खासदार धानोरकर हे नागपुरात उपचार घेत होते. पिता-पुत्राच्या लागोपाठ मृत्यूमुळे धानोरकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.