अहमदाबादमध्ये काँग्रेस नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू

1141

अहमदाबादमध्ये काँग्रेसच्या एका नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बद्रुद्दीन शेख असे या नगरसेवकाचे नाव असून ते 67 वर्षांचे होते. दानीलिमडा प्रभागातून ते निवडून आले होते. हा भाग सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. शेख यांना कोरोनाव्यतिरिक्त विविध व्याधींनी ग्रासले होते. विविध आजारांमुळे त्यांची प्रकृती खालावली होती, आणि त्यातच त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

 हे वाचलेत का? …तर 31 मे पर्यंत अहमदाबादमध्ये कोरोनाचे आठ लाख रुग्ण, गुजरात डेंजर झोनमध्ये

गुजरातमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ही वाढीस लागली असून अहमदाबाद आणि सूरत ही कोरोनाग्रस्तांच्या वाढीची मुख्य केंद्रे बनली आहेत. सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या आकड्यांनुसार गुजरातमध्ये 24 तासात 247 नव्या कोरोनाग्रस्तांची भर पडली होती. यातील अहमदाबादची आकडेवारी ही चिंतेत भर घालणारी आहे. मुंबईमध्ये कोरोनाबाधितांचा मृत्यूदर हा 3.8 टक्के असल्याचे काही वर्तमानपत्रांनी म्हटले आहे. तर अहमदाबादमध्ये हाच दर 4.7 टक्के इतका असल्याचं वृत्त याच काही वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केलं आहे.

देशभरात 24 तासात कोरोनाचे 1396 नवे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत रुग्ण संख्या 28380 इतकी झाली असून मृतांची संख्या 886 झाली आहे. 6184 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्ण बरे होण्याचे देशातील प्रमाण हे 22.17 इतके आहे. 18 दिवसांत 16 जिल्ह्यांमध्ये एकही नवीन कोरोनाग्रस्त सापडलेला नाहीये. 14 दिवसांत एकही रुग्ण न आढळलेले जिल्हे 85 झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या