…ही तर फडणवीसांची बौद्धिक दिवाळखोरी, मनमोहन सिंग यांच्यावर टीका करणाऱयांना काँग्रेसने सुनावले

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यानंतर डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात देशात पहिल्यांदाच दोन आकडी सकल महसूल उत्पन्न वाढ नोंदवली गेली. त्यांच्या दहा वर्षांच्या काळात देशाचा सरासरी विकास वाढीचा दर 7.5 टक्के राहिला. त्या मनमोहन सिंग यांच्या काळात देश रसातळाला गेला असे म्हणणे म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची बौद्धिक दिवाळखोरी असल्याची टीका कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

मोदींच्या नेतृत्वाखाली देशाने जीडीपीच्या अधोगतीचा ऐतिहासिक उच्चांक गाठला आणि रसातळ काय असतो याची ओळख स्वतःच देशाला पटवून दिली आहे, असा टोला बाळासाहेब थोरात यांनी फडणवीस यांना लगावला आहे.

देश आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर

जीएसटीचा परतावा राज्यांना देणे कायद्याने बंधनकारक असतानाही केंद्र सरकार हात कर करत आहे. याकरून मोदींच्या प्रतापाने देश आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर आहे हे स्पष्ट आहे. आपण चीनला बेटकुळ्या फुगवून दाखवत आहोत असा दिखावा करायचा आणि चिनी बँकांकडूनच कर्ज घेऊन हिंदुस्थानात घुसखोरी करणाऱया चीनला क्लीन चिट द्यायची हे मोदींच्या काळातच होत आहे, असे ते म्हणाले.

असे सुरू आहे लोकशाहीचे अधःपतन

  • देशात सामाजिक विद्वेष आणि राज्या राज्यांमध्ये संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
  • विरोधी पक्षांच्या सरकारविरोधात साम-दाम-दंड-भेद नीती वापरायची, आमिषे दाखवायची, यंत्रणांची भीती दाखवून आमदार, खासदार फोडायचे.
  • विरोधात आवाज उठवणाऱयांवर देशद्रोह, यूएपीए कायद्याखाली खटले भरायचे आणि त्यांना जामीन मिळू नये याची व्यवस्था करायची.
  • धार्मिक द्वेष व दंगे पसरवणाऱयांना व त्याच्या समर्थकांना सरकारी संरक्षण द्यायचे.
  • संवैधानिक यंत्रणांचे स्वातंत्र्य संपुष्टात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.
आपली प्रतिक्रिया द्या