बांग्लादेशसमोर मोदी सरकारची नरमाईची भूमिका, हिंदू होरपळत आहेत; काँग्रेसचे टीकास्त्र

बांग्लादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात काँग्रेसने केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. मोदी सरकार आंतरराष्ट्रीय स्तरावर कमकुवत झाले आहे. मोदी सरकारने बांग्लादेशसमोर नरमाईची भूमिका घेतल्याने बांग्लादेशातील हिंदू होरपळत असल्याची टीका काँग्रेसचे नेते प्रमोद तिवारी यांनी केली आहे. केंद्र सरकारने हिंमत दाखवावी. पंतप्रधान मोदींनी प्रेरणा घेण्यासाठी इंदिरा गांधींच्या समाधीला भेट द्यावे असेही प्रमोद तिवारी म्हणाले.

बांग्लादेशात सातत्याने हिंदूंवर हल्ले होत आहेत. बांग्लादेशातील सत्तापालटानंतर हिंदूंवरील हल्ले सातत्याने वाढत आहेत. या अत्याचाराविरोधात देशात निषेध व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेसने हिंदूंवरील अत्याचाराच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर आगपाखड केली आहे.

“बांगलादेशात आमच्या मंदिरातील देवी-देवतांच्या मूर्ती तोडल्या जात आहेत आणि 56 इंचाची छाती असलेले हे लोक चिंता व्यक्त करत आहेत. हे लोक 1971 विसरले आहेत. हे लोक इंदिरा गांधीजींना विसरले आहेत. मोदीजी, भानावर या. इंदिराजींच्या समाधीवर जा आणि त्यांच्याकडून प्रेरणा घ्या”, असे तिवारी पुढे म्हणाले.

बांग्लादेशने हिंदूंवरील अत्याचाराचे आरोप फेटाळले आहेत. ढाका येथील हिंदू नेत्याच्या अटकेचे चुकीचे चित्रण करण्यात आले आहे. हिंदू नेत्याला विशिष्ठ आरोपांनुसार अटक करण्यात आल्याचे स्पष्टीकरण बांग्लादेशने संयुक्त राष्ट्रांकडे दिले आहे. तसेच देशात अल्पसंख्याकांवर कोणताही नियोजित हल्ला झालेला नसल्याचा दावाही बांग्लादेशने केला आहे.

इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतना (इस्कॉन) चे माजी सदस्य आणि हिंदू धर्मगुरू चिन्मय कृष्ण दास यांना सोमवारी ढाक्याच्या हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली. यानंतर मंगळवारी त्यांना चितगावच्या सहाव्या मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने देशद्रोहाच्या खटल्यात जामीन नाकारला आणि त्याला तुरुंगात पाठवले. यानंतर हिंदुस्थानात याबाबत निषेध व्यक्त करण्यात येत आहे.