गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करा !

सामना ऑनलाईन । पणजी

कर्करोगावर उपचारासाठी अमेरिकेला गेलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि अन्य दोन मंत्रांच्या सतत अनुपस्थितीमुळे गोव्याचे सरकारी प्रशासन पार कोलमडले आहे असा आरोप करीत काँग्रेसने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी राज्यपालांकडे केली आहे, या मागणीच्या पूर्ततेसाठी आपण राज्यपाल मृदुला सिन्हा यांना भेटणार असल्याचे गोवा काँग्रेसचे प्रवक्ते रमाकांत खलप यांनी दिली.

गोव्याचे प्रशासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि अन्य दोन आजारी मंत्री ऊर्जामंत्री पांडुरंग मडकईकर व शहर विकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या सततच्या गैरहजेरीमुळे नेतृत्वहीन झाले आहे.मुख्यमंत्री पर्रीकर याना उपचारासाठी सतत परदेशी जावे लागते .तरी त्यांनी आपला प्रभार दुसऱ्याकडे सोपवलेला नाही. मडकईकर आणि डिसोझा हे दोन मंत्री राज्याच्या कारभारात कधी परतणार हे निश्चित नाही .अशा स्थितीत प्रशासन चालवायचे कुणी, असा सवाल करून खलप म्हणाले ,राज्य शासन संवेधानिक संकटात सापडले असून प्रशासन चालविण्यासाठी गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी काँग्रेस राज्यपालांकडे करणार आहे,अशा स्थितीत राज्यपालांनी या प्रकरणी हस्तक्षेप करायला हवा असेही खलप यांनी सांगितले.

पर्रीकरांसह तीन मंत्री आजाराच्या विळख्यात
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर याचवर्षी मार्च ते जून या कालावधीत उपचारासाठी अमेरिकेत गेले होते. ते पुन्हा 10 ऑगस्टला अमेरिकेला गेले आणि 22 ऑगस्टला मायदेशी परतले .आता पुन्हा ते उपचारासाठी अमेरिकेला गेले असून 8 सप्टेंबरला देशात परतणार आहेत. ऊर्जामंत्री मडकईकर यांच्यावरही 5 जूनपासून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहर विकासमंत्री डिसोझा हेही मागील महिन्यात उपचारासाठी अमेरिकेला गेले आहेत.

“गेल्या सहा महिन्यांपासून गोवा सरकारचे प्रशासन नेतृत्वाअभावी संकटात आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या पाठोपाठ राज्याचे अन्य दोन मंत्रीही आजारी पडलें आहेत. मी त्या सर्वांच्या उत्तम आरोग्यासाठी देवाकडे प्रार्थना करतोय. पण किती काळ आम्ही प्रशासनाचा ढिम्मपणा पाहत बसणार. राज्यपालांनी याप्रकरणी हस्तक्षेप करीत ही समस्या सोडवायला हवी,” असे गोवा काँग्रेस प्रवक्ते रमाकांत खलप म्हणाले.