इच्छुकांची कृपा, अर्ज विकून काँग्रेसने मिळवले 1.75 कोटी रुपये

858

उमेदवारी मिळवण्यासाठी काँग्रेसच्या इच्छुकांनी पक्षाकडे अर्ज केले आहे. हे अर्ज विकून काँग्रेसने 1.75 कोटी रुपये कमावले आहेत. या कमाईमुळे महाराष्ट्रातील काँग्रेस नेते खूश झाले आहेत. काँग्रेसकडून तिकीट मिळवण्यासाठी आतापर्यंत 1400 इच्छुक उमेदवारांनी अर्ज विकत घेतले आहेत. या अर्जांसाठी जे शुल्क द्यावे लागते त्यातून काँग्रेसला एक कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे. यापूर्वीही काँग्रेसने त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना पक्षाला सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन केले होते, मात्र या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता.

काँग्रेसकडून खुल्या प्रवर्गातून तिकीट मिळवण्यासाठी इच्छुकांना जो अर्ज दाखल करावा लागतो त्यासाठी इच्छुकाला 15,000 रुपये काँग्रेसला द्यावे लागतात. राखीव प्रवर्गांसाठी ही रक्कम 10,000 इतकी आहे. आतापर्यंत खुल्या आणि राखीव अशा दोन्ही प्रवर्गातील प्रत्येकी 700 इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये 200 महिलांचाही समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर आपल्याला फारसा प्रतिसाद मिळणार नाही असं महाराष्ट्रातील काँग्रेस  नेत्यांना वाटत होतं. मात्र जी रक्कम जमा झाली आहे त्यामुळे हे नेते आता खूश झाले आहेत. या संदर्भातील वृत्त हे टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

भंडारा जिल्ह्यातून सर्वाधिक म्हणजे 17 अर्ज दाखल झाले आहेत. त्याखालोखाल 16 अर्ज हे यवतमाळ जिल्ह्यातून दाखल झाले आहेत. काँग्रेसचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडेही आतापर्यंत 850 इच्छुकांचे अर्ज आले आहेत. यातील 250 अर्ज हे महिलांचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने अर्जांसाठीचे शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 5,000 तर राखीव प्रवर्गासाठी 2,500 रूपये इतके ठेवले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या