कर्नाटकात भाजपला धोबीपछाड देत काँग्रेस ठरली ‘बाहुबली’

सामना ऑनलाईन । बंगळुरू

कर्नाटकात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर होत आहेत. निकालाच्या सुरुवातीपासूनच काँग्रेस आघाडीवर होती. या निकालांमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या निवडणुकामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल वाढणार आहे. 2,664 जागांपैकी 2,662 जागांचे निकाल जाहीर झाले असून काँग्रेसला 982 जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेसला भाजपपेक्षा तब्बल 53 जागा जास्त मिळाल्या आहेत. कर्नाटकात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत काँग्रेस बाहुबली ठरली आहे.

जाहीर झालेल्या 2,662 जागांपैकी काँग्रेसला 982, भाजपला 929 तर जेडीएसला 375 जागा मिळाल्या आहेत. तर अपक्षांना 329 जागा मिळाल्या आहेत. 375 जागा मिळवून जेडीएस तिसऱ्या स्थानावर आहे. ही निवडणूक प्रामुख्याने काँग्रेस आणि भाजपमध्येच होती. या निवडणुकांमध्ये शक्तीप्रदर्शनासह आगामी लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांचे मनोबल वाढण्याचाही हेतू होता. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सत्ता स्थापनेसाठी भाजपने केलेले सगळे ‘येडी’चाळे फसले होते. आता जनतेनेही भाजपला नाकारत काँग्रेसच्या बाजूने कौल दिल्याने काँग्रेसचे मनोबल वाढले आहे.

कर्नाटकात 105 स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाचे निकाल जाहीर होत आहेत. या निवडणुकीसाठी शहरी भागात एकूण 8,340 उमेदवार रिंगणात होते. काँग्रेसचे 2306, भाजपचे 2203 आणि जेडीएसचे 1397 उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकांसाठी 31 ऑगस्टला मतदान झाले होते. तसेच म्हैसूर, शिवामोगा आणि तुमाकुर महापालिकेसाठीही याच दिवशी मतदान झाले होते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काँग्रेस आणि जेडीएसने स्वबळावर लढवल्या होत्या. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे.