शिंदेंना 18 वर्षात काँग्रेसने काय-काय दिले त्याची यादीच जाहीर केली

6364

ऐन धुळवडीच्या दिवशी ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत मोठा धक्का दिला. शिंदे यांना योग्य तो सन्मान मिळाला नसल्याचा आरोप करत त्यांच्या 22 समर्थक आमदारांनीही राजीनामे दिले आहेत. शिंदे स्वत: जरी ही बाब बोलत नसले तरी समर्थक ही त्यांच्याच भावना व्यक्त करत असल्याचं बोललं जात आहे. यामुळे काँग्रेसने शिंदे यांचे आरोप खोडून काढण्यासाठी गेल्या 18 वर्षात त्यांना काय-काय दिलं याची यादीच जाहीर केली आहे.

शिंदे हे 18 वर्षांपासून काँग्रेससोबत होते. एक तरुण नेतृत्व म्हणून तसेच एकेकाळी राहुल गांधींचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. त्यांच्या पक्ष सोडण्याने मध्य प्रदेशात काँग्रेस संकटात तरच आलीच आहे शिवाय दु:खीही झाली आहे. सगळं देऊनही शिंदे यांनी पक्ष सोडल्याने तिथल्या नेत्यांना तसेच काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांना वाईट वाटतंय. काँग्रेसने बुधवारी एक ट्विट केलं त्यात शिंदे यांना काँग्रेसने नेमके काय-काय दिले हे सांगितले आहे. ज्यात म्हटलंय की त्यांना 17 वर्ष खासदार बनविले, दोन वेळा केंद्रीय मंत्री, राष्ट्रीय सरचिटणीस, निवडणूक प्रचार प्रमुख अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांना दिल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे.

शिंदे यांनी मंगळवारी राजीनाम्याचे कारण देताना म्हटले होते की त्यांना काँग्रेसमध्ये राहून जनसेवा करता येत नाहीये. त्यांच्या समर्थकांनी पक्षात त्यांना योग्य वागणूक मिळत नसल्याचंही म्हटलं होतं. यावर काँग्रेसने हे ट्विट करून इतकं सगळं देऊनही मोदी आणि शहांना शरण का गेलात? असा प्रश्न विचारला आहे.
हे ट्विट करत असताना काँग्रेसने एक फोटोही शेअर केला आहे. शिंदे यांनी विश्वासघात केला असं सुचवणारे हे चित्र आहे.

शिंदे यांनी काँग्रेस सोडल्यानंतर काँग्रेसच्या काही नेत्यांनी त्यांना गद्दार म्हटले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी शिंदे यांच्या राजीनाम्याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले की ‘ज्या पक्षाने शिंदे यांना महाराज बनवले त्याच पक्षाशी त्यांनी गद्दारी केली’

आपली प्रतिक्रिया द्या