महाराष्ट्र राज्य हे महिलांचा सन्मान करणारे राज्य आहे. मात्र आता याच राज्यात महिला सुरक्षित नसल्याच्या घटना दिवसेंदिवस घडत आहे. ज्या राज्यात शिवरायांनी बलात्काऱ्यांना कठोर शिक्षा केली. त्याच राज्यातील आरोपी आता मोकाट सुटले आहे. दिवसाढवळ्या महिला बेपत्ता होत आहेत. शाळेत जाण्याऱ्या चिमुरड्यावर अत्याचार होत आहे. मात्र, इतक सगळं होऊनही सरकार काहीच करताना दिसत नाही, असा आरोप काँग्रेसने केला आहे.
राज्यातील महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत असून ते सरकारला दिसावे यासाठी कॉंग्रेसने राज्यभरात लापता लेडिज पोस्टर लावून सरकारच्या नाकर्तेपणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. या पोस्टरवर गेल्या वर्षभरातील बेपत्ता महिला आणि मुलींचा आकडा देण्यात आला आहे. पोस्टरवर देण्यात आलेली वर्षभरातील 64 हजार महिला बेपत्ता असल्याची आकडेवारी चिंताजनक आहे. याचसोबत या पोस्टर्समध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचेही फोटो आहेत.
काँग्रेसच्या या मोहिमेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीसांचा कार्यकाळ महिला सुरक्षेच्या दृष्टीने पूर्णपणे अपयशी ठरला आहे. सध्या राज्यभरात दिवसासुद्धा एकही मुलगी अथवा महिला सुरक्षित नसल्याचे चित्र आहे. महिलांची सुरक्षा हा देशासाठी चिंतेचा विषय आहे. महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे 64 हजार मुली आणि महिला बेपत्ता होत आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेबाबत हे सरकार अपयशी ठरल्या असल्याचा आरोप या पोस्टरमधून करण्यात आला आहे.
काँग्रेसच्या मोहिमेचे पोस्टर्स आता संपूर्ण राज्यभर झळकत आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नांवर नागरिकाकंडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. देवेंद्र फडणवीसांचा कार्यकाळ महिला सुरक्षेच्या दृष्टीने पूर्णपणे अपयशी ठरला आहे. त्यामुळे महाष्ट्रात महिला सुरक्षित राहणार नसतील तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा, अशी थेट मागणी नागरिकांकडून होत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.