#Article370 माझा जन्म ‘देशभक्त’ कुटुंबातील, ज्येष्ठ नेत्याचे काँग्रेस सोडण्याचे संकेत

2308

जम्मू-कश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या निर्णयावर काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहे. काही नेत्यांनी मोदी सरकारला या निर्णयावर पाठिंबा दिला आहे तर अनेकांनी यावर टीका केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी देखील कलम 370 हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला समर्थन दिले असून स्वपक्षावर आसूड ओढले आहेत. तसेच काँग्रेसला रामराम करून नवा पक्ष स्थापन करण्याचे संकेत दिले आहेत.

माझा जन्म देशभक्त कुटुंबात झालेला आहे, असे म्हणत भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांचे एका शेर म्हणून कान टोचले. ‘उसूलों पे जहाँ आँच आये, वहा टकराना ज़रूरी है, जो ज़िन्दा हों तो फिर ज़िन्दा दिखाना जरूरी है’, हा शेर त्यांनी सभेमध्ये म्हटला. ‘सरकार जेव्हा काही चांगले निर्णय घेते तेव्हा त्याचे समर्थन करायला हवे असेही ते म्हणाले. देशभक्ती आणि स्वाभिमानाशी तडजोड नाही’, असे म्हणत त्यांनी पक्ष सोडण्याचे संकेत दिले.

आताची काँग्रेस भरकटलेली 

तसेच ‘काँग्रेस आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. आताची काँग्रेस भरकटलेली आहे’, असे भूपेंद्र सिंह हुड्डा म्हणाले. आता मी स्वत:ला भूतकाळापासून मुक्त करू इच्छित आहे. एक समिती स्थापन करून निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले.

याआधी काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे, दिपेंद्रसिंह हुड्डा यांनी देखील कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला होता. तर गुलाम नबी आझाद यांनी विरोध केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या