नगरमध्ये काँग्रेस-शिवसेनेच्या वतीने स्व.बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन

897

महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती वेगाने बदलत असून आता नगर शहरासह जिल्ह्याच्या विकासासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे सरचिटणीस विनायक देशमुख यांनी व्यक्त केली. दरम्यान, काल प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्थानिक पातळीवर सुध्दा एकत्र येण्याचा निर्णय घेण्यात येईल असे सुतोवाच केल्यानंतर आज राज्याचे काँग्रेसचे नेते विनायक देशमुख यांनी स्वतः नगरच्या शिवसेना कार्यालयात जाऊन याची सुरवात केली.

देशमुख यांनी आज शिवसेनेच्या शिवलय या कार्यालयात जाऊन स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार करुन आदरांजली अर्पण केली. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेनेचे उपनेते तथा माजी मंत्री अनिल राठोड उपस्थित होते.

यावेळी देशमुख यांनी राठोड यांच्यासमवेत शहराच्या प्रश्‍नांबात व राजकीय स्थितीबाबत चर्चा केली. याबाबत माहिती देताना देशमुख म्हणाले की, “राज्यस्तरावर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांनी एकविचाराने काम करण्यास सुरवात केली आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी काल संगमनेरमध्ये बोलताना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत दिले आहे. नगर जिल्हयात जिल्हा परिषद व महापालिकेवर यांचा मोठा परिणाम होऊ शकतो.” आज आपण स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त माजी मंत्री अनिल राठोड यांची सदिच्छा भेट घेतली. राज्यात सर्वच जिल्हयात राज्यातील नवीन मित्रांमध्ये समन्वयाची प्रक्रिया सुरु झाली आहे, असे देशमूख म्हणाले.

आगामी काळात शहरातील रस्त्यांची भीषण अवस्था, मंदावलेला औदयोगिक विकास, पर्यटन विकास, बेरोजगारीची समस्या याबाबत प्रामुख्याने काम करण्याची असुन याबाबत आपण पुढाकार घेणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या