शशी थरूर केजरीवालांना म्हणाले ‘किन्नर’, वादानंतर मागितली माफी

846

राजधानी दिल्लीतील विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता राजकीय वातावरण तापत आहे. तसेच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करताना काँग्रेसचे नेते शशी थरूर यांचा तोल गेला आहे. ते केजरीवाल यांना ‘किन्नर’ (Eunuch) म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरून वाद वाढत असल्याने थरूर यांनी आपल्या टीकेला तर्काचा दाखला दिला आहे. तसेच माफीही मागितली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जबाबदारीशिवाय सत्ता हवी आहे. किन्नर असे असे अनेक शतकांपासून करत आहेत, असे थरूर म्हणाले. सोशल मीडियावर शशी थरूर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. तसेच अनेकांनी थरूर यांना टीकेचे लक्ष्य केले. या वक्तव्याने वाद वाढत असल्याचे दिसताच थरूर यांनी तर्क देत माफी मागितली आहे. एका प्रसारमाध्यमामध्ये नागरिकत्त्व सुधारणा कायद्याबाबतच्या चर्चेत थरूर सहभागी झाले होते. त्यांना केजरीवाल यांच्या भूमिकेबाबत विचारले असता, ते म्हणाले केजरीवाल यांना एकाचवेळी दोन्ही बाजूंना राहायचे आहे. कायद्याचे समर्थक आणि विरोधक दोघांनाही आपल्या बाजूला वळवण्याचे केजरीवाल यांचे प्रयत्न आहेत. केजरीवाल यांच्याकडे मानवांकडे असलेल्या संवेदनाही नाहीत. हिंसाचाराला बळी पडलेल्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून काही अपेक्षा आहेत. मात्र, त्या पूर्ण करण्याची केजरीवाल यांची इच्छा नाही. त्यांना जबाबदारीशिवाय सत्ता हवी आहे. अनेक शतकांपासून किन्नरांचा हा विशेषाधिकार आहे, असे थरूर म्हणाले.

या विधानावर सोशल मीडियावर निषेध व्यक्त करण्यात आल्यावर थरुर यांनी आपल्या वक्तव्याबाबत माफी मागितली. मात्र, या वक्तव्यात आक्षेपार्ह काहीच नाही. ब्रिटनच्या राजकारणातील हा एक वाक्प्रचार आहे. याचा संबंध किपलिंग आणि तत्कालीन पंतप्रधान स्टॅनले बाल्डविन यांच्याशी आहे. नुकताच हा वाक्प्रचार टॉम स्टॉपर्ड यांनी वापरला होता. मात्र, आपल्याकडे याला वेगळा संदर्भ असल्याने आपले वक्तव्य अयोग्य होते असे सांगत थरूर यांनी माफी मागितली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या