पुण्याच्या राजकारणात मीरा कलमाडी करणार प्रवेश?

55

सामना ऑनलाईन । पुणे

आठ वर्षांपूर्वी दिल्ली कॉमनवेल्थ गेम्समधील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून बाहेर गेलेले काँग्रेसचे नेते सुरेश कलमाडी पुन्हा राजकीय वर्तुळात परत येण्याचा प्रयत्न करत आहेत. ते थेटपणे राजकारणात येणार असल्याचे सांगत नसले तरी आगामी लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांच्या पत्नी मीरा कलमाडी उमेदवारी दाखल करणार असल्याचे बोललं जात आहे. मीरा कलमाडी पुण्याच्या राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. शहरामध्ये पहिल्यांदाच काँग्रेस नेत्यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मीरा कलमाडी सामील झाल्याने या चर्चांना हवा मिळत आहे.

२०१० मध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर सुरेश कलमाडी यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे तिकीटही नाकारण्यात आले होते. त्यानंतर विश्वजीत कदम यांना निवडणूक लढवण्यास सांगण्यात आले. मात्र या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या विश्वजीत कदम यांचा पराभव झाला आणि भाजपचे नेते अनिल शिरोळे खासदार म्हणून निवडून आले. त्यामुळेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीला काही महिन्यांचा अवधी असताना कलमाडी कुटुंबीय आणि कार्यकर्ते मीरा कलमाडी यांच्या नावासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा रंगली आहे.

मीरा कलमाडी यांनी पहिल्यांदाच काँग्रेसचे नेते वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी निमित्त काँग्रेसने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सहभाग घेतला. काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य संजय बालगुडे यांनी पुणे शहरात १०० ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचा संकल्प केला होता. या कार्यक्रमात मीरा कलमाडी या प्रमुख उपस्थितांमध्ये होत्या. त्यामुळेच शहरातील राजकीय पक्षाच्या जाहीर कार्यक्रमातील त्यांची उपस्थिती ही सध्या चर्चेचा विषय झाली आहे. मात्र मीरा कलमाडी यांना याबाबत विचारलं असता त्यांनी सध्या तरी राजकीय पटलावर येण्याबाबत कोणताही विचार नसल्याचं म्हटलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या