मोदींच्या चांगल्या कामांचे कौतुक करा! ‘ईडी’पीडेनंतर काँग्रेस नेत्यांची भाषा बदलली

533
narendra-modi

आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अटकेनंतर आता काँग्रेसच्या अनेक नेत्यांची भाषा बदलली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना सतत चुकीचे ठरवू नका, त्यांच्या चांगल्या कामांचे कौतुक करा. मोदींना सातत्याने खलनायक ठरवणे योग्य नाही, असे या नेत्यांनी म्हटले आहे.

मोदींना खलनायक ठरवणे चुकीचे!
मोदी हे वाईट आहेत असे म्हणणे चुकीचे ठरेल. कोणत्याही व्यक्तीच्या कामाचे आकलन त्याच्या व्यक्तिमत्त्वावरून नाही तर त्याने केलेल्या कामावरून तसेच त्याबाबतच्या मुद्दय़ांवरून करा, असे काँग्रेस नेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे. मोदींना सतत खलनायक ठरवणे चुकीचे आहे. ते देशाचे पंतप्रधान आहेत. विरोधक सतत त्यांना विरोध करण्याचा मार्ग पत्करतात. परंतु हे पूर्णपणे चुकीचे असून त्याचा फायदा पंतप्रधानांनाच होत आहे. दरम्यान, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीही मोदींना खलनायक ठरवणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. अशी भाषा त्यांच्या विरोधात वापरली तर त्यांच्यासमोर उभे राहण्याचीही हिंमत त्यांच्यावर टीका करणाऱयांमध्ये येणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

चांगल्या कामांचे कौतुक झाले पाहिजे!
नरेंद्र मोदी जर चांगले काम करत असतील तर त्यांच्या चांगल्या कामांचे कौतुक झालेच पाहिजे, असे काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी म्हटले आहे. मोदींनी काही चांगले केले तर ते कौतुकास्पदच आहे हे मी गेल्या सहा वर्षांपासून सांगतोय. असे केल्यामुळे भविष्यात जर मोदींनी चूक केली तर त्यांच्यावर टीका करण्याचे बळ आपल्याला मिळेल, असेही थरूर यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या