सत्तास्थापनेचे निमंत्रण द्या, गोव्यातील काँग्रेस आमदारांचे राज्यपालांना निवेदन

24

सामना ऑनलाईन । पणजी

बहुमत नसतानाही केवळ मोठा पक्ष म्हणून भाजपनेते येडियुरप्पा यांना कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांनी सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिल्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील काँग्रेसच्या १३ आमदारांनी आज राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसच्या आमदारांनी गोव्यातील मोठा पक्ष म्हणून त्यांनाही सत्ता स्थापनेचे निमंत्रण देण्याची मागणी करणारे निवेदन सिन्हा यांना दिले आहे. १६ आमदारांच्या सह्यांचे पत्रही राज्यपालांना यावेळी देण्यात आले.

गेल्या वर्षी गोव्यात झालेल्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचे १६ उमेदवार निवडून आले होते तर भाजपचे १३ उमेदवार निवडून आले होते. मात्र भाजपने एका रात्रीत चक्रे फिरवत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि ३ अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळवत गोव्यात सत्ता स्थापनेचा दावा केला. गोव्यात हाता तोंडाशी आलेली सत्ता भाजपने युक्तीने काँग्रेसकडून हिसकावून घेतली होती. त्यामुळे आता भाजपने कर्नाटकात सर्वात मोठा पक्ष असल्याने सत्ता स्थापन केली आहे त्याच धर्तीवर गोव्यात आम्हालाही सत्ता स्थापनेची संधी द्यावी अशी मागणी काँग्रेसच्या आमदारांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या