राष्ट्रवादीनेच काँग्रेसला गिळले, तोच खरा शत्रू, काँग्रेस नेत्याची टीका

3430

सातारा जिल्ह्यात आम्ही आघाडी धर्म पाळला परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने कधीच काँग्रेसला मायेने जवळ केले नाही. राष्ट्रवादीने काँग्रेस पक्ष गिळला. काँग्रेसचा खरा शत्रू राष्ट्रवादीच आहे, अशा शब्दात जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस, जिल्हा परिषद सदस्य भीमरावकाका पाटील यांनी राष्ट्रवादीवर हल्ला चढवला. ‘गत विधानसभा निवडणुकीत धैर्यशील कदम यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. परंतु आमच्याच पक्षातून काहींनी घात केला. मागील वेळेची चूक आम्ही सुधारणार असून यावेळी महायुतीचे धैर्यशील कदम य‍ांना बहुमताने विधानसभेत पाठवणार आहोत’ असा निर्धारही पाटील यांनी व्यक्त केला.

शिवसेना-भाजप- रिपाई-रासप-रयत क्रांती-शिवसंग्राम महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम यांच्या प्रचारार्थ वाठार किरोली ( ता. कोरेगाव ) येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम, रहिमतपूचे माजी नगराध्यक्ष संपतराव माने, संजय माने, प्रमोद ढाणे, गणेश घोरपडे, कोरेगाव पंचायत समितीचे सदस्य नारायणराव काकडे, कोरेगाव खरेदी-विक्री संघाचे माजी व्हाईस चेअरमन भरतराव गायकवाड, प्रकाश पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.

  भीमराव पाटील म्हणाले, ” आज जे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच उठता बसता नाव घेतात, त्यांनी चव्हाण साहेबांच्या निवडणुकीवेळी कोणत्या पद्धतीचा प्रचार केला होता हे सर्वांना ज्ञात आहे. येथील जनता ते विसरलेली नाही. कराड दक्षिणच्या विधानसभा निवडणुकीत आनंदराव पाटील यांना उपरे म्हणून हिणवनारी मंडळी आज कराड उत्तर मध्ये उपरी नाहीतर कोण आहेत? कार्यक्षेत्र दक्षिण मध्ये, घर दक्षिण मध्ये आणि उत्तर मध्ये निवडणुका लढवत आहेत. अशा मतलब्यांना जनताच घरचा रस्ता दाखवेल. 2014 च्या निवडणुकीत धैर्यशील यांना तिरंगी लढतीमुळे विजयाने हुलकावणी दिली होती. यावेळी आपल्याकडे जनमताचा रेटा आहे, त्यामुळे धैर्यशील कदम तुमचा विजय निश्चित आहे.”

आपली प्रतिक्रिया द्या