काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणुका लढणार

33

सामना प्रतिनिधी । मुंबई

काँग्रेस आणि इतर समविचारी पक्षांशी चर्चा झाली असून महाराष्ट्रात एकत्र निवडणुका लढवायचा निर्णय झाल्याने जागावाटपामध्ये अडचण येणार नाही. मुंबईमध्ये एकत्र लढणार आहोत. त्यामुळे जास्त जागा मिळतील अशी अपेक्षा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यक्त केली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी शरद पवार पुढे म्हणाले की, सर्वांना एकत्र घेऊन मुंबई शहरातील शक्ती जोमाने आणि समन्वयाचे वातावरण मुंबईत कसे राहील यासाठी प्रयत्न करावा. मुंबईमध्ये निवडणुका जवळ आल्याने संघटनेला व्यवस्थित चेहरा द्यायचा आहे. यश-अपयश येतच असते. परंतु विचार आणि बांधिलकी कायम ठेवायची असते ती बांधिलकी तुम्ही ठेवली आहे, असेही शरद पवार म्हणाले.

राष्ट्रवादी मुंबई अध्यक्ष बदलणार?
दरम्यान मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची निवड करण्याबाबत मुंबई पक्ष कार्यालयात मुंबई पदाधिकाऱयांची बैठक पार पडली. विद्यमान अध्यक्षांबद्दल असलेली भावना तसेच कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली मतभिन्नता लक्षात घेऊन मुंबई अध्यक्षपदाची निवड एक दिवसासाठी पुढे ढकलण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांच्यासमोर उद्या मुंबई जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून मुंबई अध्यक्ष निवड केली जाईल असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले.

गिरणगाव बदलले
मुंबई ही कामगारांची नगरी म्हणून ओळखली जायची. कामगारांची सामूहिक शक्ती पाहायला मिळत होती. गिरणगाव हे गिरणगाव आज राहिलेले नाही. वेगळया विचारांचा कामगार आज आला आहे. त्यामध्ये व्हाईट कॉलर कामगारांचा समावेश आहे. विशेषकरून त्यामध्ये शासकीय कामगार, अनेक संस्थांमध्ये काम करणारा कामगार आहे असे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या