पक्कं ठरलं! काँग्रेस, राष्ट्रवादीत एकमत; आज शिवसेनेसोबत मुंबईत चर्चा!

992

महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरता दूर करण्याच्या दृष्टीने जे प्रयत्न सुरू आहेत त्यामध्ये शिवसेनेसोबत मिळून राज्यात पर्यायी सरकार स्थापन करण्याबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत एकमत झाले. शुक्रवारी महाआघाडीच्या घटकपक्षांशी मुंबईत चर्चा केली जाईल. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांसोबत चर्चा करून सत्तास्थापनेबाबत पुढील निर्णय जाहीर केला जाईल अशी माहिती काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिकही उपस्थित होते.

महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून निर्माण झालेला पेच सोडविण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी तसेच पक्ष कार्यालयांत बैठकांवर बैठक सुरू होत्या. बुधवारी रात्री शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आघाडीच्या प्रमुख नेत्यांची मॅरेथॉन बैठक पार पडली. यामध्ये शिवसेनेसह राज्यात मिळून स्थिर व लोकाभिमुख सरकार स्थापन करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.

गुरुवारी सकाळी सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. यानंतर पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पवार यांच्या निवासस्थानी पार पडली. यावेळी आघाडी सरकारचा किमान समान कार्यक्रम, तसेच महाराष्ट्रातील विविध प्रश्न व ते सोडविण्याच्या दृष्टीने काय करता येईल याबाबत चर्चा करण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून आघाडीच्या नेत्यांत  झालेल्या चर्चेचा तपशील महाआघाडीच्या घटक पक्षांना शुक्रवारी मुंबईत होणाऱया बैठकीत सांगितला जाईल. त्यानंतर आघाडीचे प्रमुख नेते शिवसेना नेत्यांसोबत चर्चा करून राज्यात सत्ता स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करतील, असे यावेळी ठरविण्यात आले. सत्तास्थापनेचे केंद्र दिल्लीत गेले होते ते आता पुन्हा मुंबईत परतले आहे.

@ 6, जनपथ

शरद पवार यांच्या ‘6, जनपथ’ या निवासस्थानी झालेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांच्या मॅरेथॉन बैठकीला काँग्रेसकडून अहमद पटेल, जयराम रमेश, मल्लिकार्जुन खरगे, के. सी. वेणुगोपाल, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, नसीम खान तर राष्ट्रवादीकडून अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, नवाब मलिक आदी नेते उपस्थित होते.

शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करणे आवश्यक आहे. अनेक मुद्दय़ांवर सहमती झाल्याने नव्या सरकारचा मार्ग आता सुकर झाला आहे. – नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते

पर्यायी सरकार स्थापन करण्याबाबत एकवाक्यता आहे. शिवसेनेसोबत चर्चा झाल्यावर सत्तास्थापनेचे सूत्र काय असेल हे निश्चित करून राज्यपालांना भेटून तिन्ही पक्ष सत्तास्थापनेचा दावा करतील. – पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते

मुख्यमंत्री शिवसेनेचाच

महाराष्ट्रात शिवसेनेसोबत आघाडी करण्यास काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सहमती दिली असून लवकरच सत्ता स्थापन होईल. आगामी मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदासाठी आज बैठक

विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीने आपला विधिमंडळ गटनेता जाहीर केला असला तरी अद्याप काँग्रेसकडून मात्र विधिमंडळ गटनेत्याची निवड झालेली नाही.  सत्तास्थापनेबाबत दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर विधिमंडळ गटनेतेपदाबाबत काँग्रेसमध्ये एकमत झाले असून उद्या शुक्रवारी दुपारी एक वाजता बैठक होणार आहे. विधिमंडळ गटनेतेपदासाठी काँग्रेस नेते अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्या नावांबाबत चर्चा होती. मात्र दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांचे नाव विधिमंडळ पक्षनेतेपदासाठी निश्चित झाल्याचे समजते.

आपली प्रतिक्रिया द्या