काँग्रेसच्या संसदीय नेतृत्वात बदल, मनीष तिवारी, शशी थरूर यांचा काँग्रेसच्या संसदीय गटात समावेश

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज पक्षाच्या संसदीय नेतृत्वात काही बदल केले आहेत. त्यामध्ये काँग्रेस नेतृत्वाबाबत मागील वर्षी पत्र लिहिणाऱया ‘जी-23’ नेत्यांवरही जबाबदारी सोपवली आहे. त्यानुसार मनीष तिवारी आणि शशी थरूर यांचा काँग्रेसच्या संसदीय गटात समावेश केला आहे. तर अधीर रंजन चौधरी यांच्याकडे असलेले लोकसभेतील पक्षाचे नेतेपद जाणार अशी चर्चा होती, मात्र ते कायम ठेवण्यात आले आहे.

काँग्रेसच्या लोकसभा आणि राज्यसभेतील संसदीय गटाच्या नेतृत्वात बदल करण्यात आला असला तरी अधीर रंजन चौधरी यांचे लोकसभेतील पक्षाचे नेतेपद कायम आहे. तर लोकसभेतील पक्षाच्या उपनेतेपदाची जबाबदारी दिवंगत काँग्रेस नेते तरुण गोगोई यांचा मुलगा गौरव गोगोई यांच्या खांद्यावर दिली आहे. तर व्हीप प्रमुख म्हणून के. सुरेश यांच्यावर जबाबदारी दिली असून नवनीत सिंह बिट्टू आणि मनिकाम टागोर हे पक्षाचे व्हीप असणार आहेत.

राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे पक्षाच्या नेतेपदाची, तर उपनेते पदाची जबाबदारी आनंद शर्मा यांच्याकडे दिली आहे. मुख्य व्हीप म्हणून जयराम रमेश यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. त्याचबरोबर पक्षाच्या सात सदस्यीय संसदीय गटात मनीष तिवारी, शशी थरूर यांच्यासह अंबिका सोनी, पी. चिदंबरम, दिग्विजय सिंह, के. सी. वेणुगोपाल यांचा समावेश केला आहे. अधिवेशनादरम्यान या दोन्ही गटांनी दररोज एकत्र भेटून रणनीती ठरवावी, कामकाज सुरू असताना महत्त्वाच्या विषयावर एकत्र बसून चर्चा करावी असे निर्देश सोनिया गांधी यांनी दिले आहेत.

राफेलची खरेदी, कोरोना लसीकरणावरून सरकारला घेरणार

देशात कोरोनामुळे भयानक परिस्थिती निर्माण झालेली असतानाही ठोस उपाययोजना करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. लसीकरण धिम्या गतीने सुरू असल्याने कोरोनाच्या तिसऱया लाटेचा धोका निर्माण झाला आहे. राफेल विमान खरेदीची चौकशी करण्याचे आदेश फ्रान्सच्या न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे या मुद्दय़ांवरून सरकारला घेरण्याची तयारी काँग्रेसने केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या