मोदींच्या मतदारसंघात काँग्रेसचा ‘फॉरेन रिटर्न’ उमेदवार

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

डिसेंबर महिन्यात गुजरातमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. गेली अनेक वर्षे भाजपची गुजरातमध्ये एकहाती सत्ता आहे. मात्र नोटाबंदी, जीएसटी या निर्णयांमुळे वातावरण बदलत असल्याची चर्चा सुरू आहे. या परिस्थितीत मोदी-राहुल गांधी यांच्या संघर्षात कोण जिंकते?; गुजरातमध्ये भाजपची सत्ता अबाधित राहते की, काँग्रेस चमत्कार करते? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. राहुल गांधी यांनी भाजपला आव्हान देण्यासाठी तरुणांची फौज कामाला लावली आहे. विदेशात शिकलेल्या ३४ वर्षाच्या श्वेता ब्रह्मभट्ट हिला काँग्रेसने मोदींच्या मणिनगर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. श्वेता ब्रह्मभट्ट भाजपच्या सुरेश पटेल यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. मणिनगर मतदारसंघात १४ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

‘फॉरेन रिटर्न’ उमेदवार असलेल्या श्वेता ब्रह्मभट्ट हिला राजकारणाचे काही धडे घरीच मिळाले आहेत. श्वेताचे वडील नरेंद्र ब्रह्मभट्ट यांनी काँग्रेसकडून अहमदाबाद पालिकेची नगरसेवकपदाची निवडणूक लढवली आहे. मात्र श्वेता स्वतःच्या हिंमतीवर उमेदवारी मिळवल्याचे सांगते. गुजरातमधून बीबीए केल्यानंतर इंग्लंडमधील वेस्टमिनस्टर बिझनेस स्कूलमधून श्वेताने मास्टर्स केले. तिने २६व्या वर्षीच नोकरीला सुरुवात केली, एचएसबीसी आणि दाराशॉ येथे काम करुन आर्थिक गुंतवणूक क्षेत्राचा अनुभव मिळवला. नंतर श्वेताने आयआयएम बंगळुरूमधून पॉलिटिकल लीडरशिपचे शिक्षण घेतले. पॉलिटिकल लीडरशिपचे शिक्षण घेत असताना आणि नंतर काँग्रेसच्या नेत्यांच्या संपर्कात होते आणि काँग्रेससाठी काम करत होते, असे श्वेता सांगते.

महिला, तरुण यांच्यासाठी काम करायचे आहे. आगामी निवडणुकीतदेखील समाजातील या दोन घटकांच्या प्रश्नांवर मी विशेष भर देणार आहे, असे श्वेताने सांगितले. आपला समाज नेत्यांचे अनुकरण करतो, त्यामुळे आपण समाजासमोर चांगला आदर्श ठेवला पाहिजे; असे तिचे म्हणणे आहे. लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवादी विचार यांमुळेच काँग्रेससोबत असल्याचे श्वेताने सांगितले.

काँग्रेसमध्येच नाराजी

रविवारी रात्री श्वेता ब्रह्मभट्ट हिला उमेदवारी जाहीर झाली आणि सोमवारी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी आपली नाराजी जाहीर केली. मात्र काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत आणि निवडणूक आपणच जिंकू असा विश्वास श्वेताने व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या