काँग्रेस शहरी नक्षलवादींची गँग चालवत असल्याची टीका करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जोरदार प्रत्यत्तर दिले आहे. पंतप्रधान मोदी पुढारलेल्या विचारांना अर्बन नक्षल म्हणतात ही त्यांची सवय आहे. पण भाजपच दहशतवाद्यांचा पक्ष आहे. या पक्षातील लोक मॉब लिंचिंग करतात. आदिवासी महिलांवर बलात्कार करतात आणि अशा लोकांना ते पाठीशी घालतात आणि वर इतरांना दोष देतात. यावर पंतप्रधान मोदींना बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही. जिथे भाजपचे राज्य आहे तिथे अनुसूचित जाती आणि आदिवासी जनतेवर अत्याचार होतात. तुमचे सरकार आहे आणि तुम्ही या घटना रोखायला हव्या, असे खरगे म्हणाले.
पंतप्रधान मोदी 5 ऑक्टोबरला महाराष्ट्र दौऱ्यावर असताना ठाणे येथे झालेल्या सभेत त्यांनी काँग्रेस समाजात दुफळी निर्माण करत आहे. काँग्रेस आता अर्बन नक्षलींची गँग चालवत आहे. पण आपल्याला भूतकाळातून धडा घ्यायचा आहे. आपल्या एकतेला ढाल करायची आहे, असे मोदी म्हणाले होते. या विधानाचा खरगे यांनी आज जोरदार समाचार घेतला.
आज दिल्लीत पत्रकारांशी बोलताना खरगे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, मोदी हे कायमच काँग्रेसला शहरी नक्षलवादी पक्ष म्हणतात. ही त्यांची सवयच आहे. पण त्यांच्याच पक्षाचे काय? भाजप तर दहशतवाद्यांचा पक्ष आहे. त्यांचा मॉब लिंचिंगच्या घटनांमध्ये सहभाग असतो, आदिवासी तसेच अनुसूचित जातीच्या लोकांवर अत्याचार करतात. शिवाय असे जे करतात त्यांनाही हे पाठीशी घालतात. तरीही ते दुसऱयांना बोलत असतात. त्यामुळे असा आरोप करण्याचा मोदी यांना कोणताही अधिकार नाही, असे खरगे यांनी सुनावले.