इंधन दरवाढीविरुध्द काँग्रेसचा बैलगाडी आणि सायकल मोर्चा

31

सामना प्रतिनिधी । नांदेड

अच्छे दिनचे आश्वासन देणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या राज्यात ‘अच्छे दिन’ तर आलेच नाहीत पण इंधन दरवाढीमध्ये मात्र भरमसाठ वाढ झाली आणि सामान्यांचे जगणे मुश्किल झाले. शासनाच्या या धोरणाविरुध्द महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने नांदेडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी बैलगाडी, घोडे आणि सायकल मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व अमर राजूरकर, आमदार डी. पी. सावंत, आमदार वसंत चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई जवळगावकर, महापौर शीला भवरे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष गोविंदराव नागेलीकर यांनी केले.

नवामोंढा भागात सकाळपासूनच काँग्रेस कार्यकर्ते बैलगाड्या, घोडे घेऊन मोर्चासाठी एकत्र आले. नव्या मोंढ्यातून बैलगाडी, घोडेस्वार आणि सायकलस्वार यांचा मोर्चा सुरू झाला. मोर्चामध्ये काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘मोदी सरकार हाय हाय’ या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. आयटीआय मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला.

मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबई काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या सूचनेवरून नांदेड जिल्हा व शहर कमिटीच्या वतीने पेट्रोल आणि डिझेल दरवाढी विरोधात हा निषेध मोर्चा काढण्यात येत आहे. शासनाच्या निर्णयानुसार सध्या पेट्रोल ८२ रुपये व डिझेल ७० रुपये प्रति लिटर याप्रमाणे विकले जात आहे. इंधन वाढीत झालेली ही प्रचंड दरवाढ सामान्यांना जड जात आहे. ही दरवाढ अत्यंत जुलमी असून, ती उद्योगपती धार्जिणी आहे. राज्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असताना आणि सर्वसामान्य जनता भाववाढीमुळे त्रस्त असताना डिझेल आणि पेट्रोलमधील ही दरवाढ सर्वसामान्यांना आणखी अडचणीत आणणारी आहे. या दरवाढीचा आम्ही निषेध करीत आहोत, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या