आंदोलनात उतरलेल्या खासदारांना मारहाण केल्याचा राहुल गांधी यांचा गंभीर आरोप

राहुल गांधी यांनी आरोप केला आहे की महागाईविरूद्ध मोर्चात सहभागी झालेल्या खासदारांना मारहाण करण्यात आलीय. वाढत्या महागाईने जनता त्रस्त झाली असून याविरूद्ध आवाज उठवण्यासाठी काँग्रेसने मोर्चा काढला आहे. हा मोर्चा आम्ही राष्ट्रपती भवनावर घेऊन जात असताना आम्हाला अडवण्यात आलं. काँग्रेसच्या काही खासदारांना ताब्यात घेण्यात आलं तर काही खासदारांना मारहाण करण्यात आली असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

काँग्रेसने संपूर्ण देशात महागाईविरोधात आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी स्वत: आंदोलनात उतरले असून त्यांनी सरकारचा निषेध करण्यासाठी काळा शर्ट घालून आंदोलनात आपला सहभाग नोंदवला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने संसद भवनापासून राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढला होता. हा मोर्चा विजय चौक इथे अडवण्यात आला आणि तिथे पोलिसांनी राहुल गांधी यांच्यासह इतर नेत्यांना ताब्यात घेतलं.

या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती आणि त्यांनी या भागामध्ये कलम 144 लागू केलं होतं. काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांनी म्हटलंय की आम्ही राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढणार होतो, मात्र पोलिसांनी आम्हाला अडवलं असून त्यांचं म्हणणं आहे की या भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. इथे आंदोलनाला परवानगी नसल्याचंही पोलिसांचं म्हणणं आहे. काँग्रेस खासदारांनी आम्हाला अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे.