राहुल गांधी विदेशवारीवरून थेट सुरतच्या कोर्टात, गुजरातमधून केलं ट्वीट

218
rahul_gandhi

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे गेल्या काही दिवसांपासून बँकॉकमध्ये असल्याची चर्चा होती. महाराष्ट्र आणि हरियाणा अशा दोन महत्त्वाच्या राज्यात निवडणुका असताना ते विदेशात का गेले यावरून टीका सुरू होती. दरम्यान, राहुल गांधी गुरुवारी सुरतच्या सत्र न्यायालयात हजर झाले आणि बाहेर पडल्यावर त्यांनी लगेचच ट्वीट करून सरकारला लक्ष्य केले. राहुल गांधी देशात परतल्यानंतर भाजप समर्थक विरुद्ध राहुल गांधी असे युद्ध पुन्हा सोशल मीडियावर रंगले आहे.

पंतप्रधान मोदींवर टीका करताना मानहानी केल्याचा आरोप राहुल गांधी यांच्याविरुद्ध करण्यात आला आहे. याप्रकरणी सुरतच्या सत्र न्यायालयात त्यांना आज हजर रहायचे होते. दरम्यान त्यांच्यावरील खटल्यातील आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता पुढली सुनावणी 10 डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे.

राहुल गांधी न्यायालयात दाखल झाल्यावर न्यायमूर्तींनी त्यांच्यावरील आरोप वाचून दाखवले. ‘तुमच्यावर करण्यात आलेले आरोप मान्य आहेत का’ असा प्रश्न राहुल गांधी यांना न्यायालयात विचारण्यात आला. यावर मी काही चुकीचे बोललेलो नाही, असे राहुल गांधी यांनी न्यायालयाला सांगितले. त्यानंतर राहुल गांधी यांच्या वकिलांनी पुढली तारीख मागितल्यावर 10 डिसेंबर ही नवी तारीख देण्यात आली. तसेच पुढल्या सुनावणीसाठी राहुल गांधी यांना हजर न राहण्याची परवानगी मिळावी अशी देखील मागणी त्यांचे वकील किरीट पानवाला यांनी केली. यावर देखील 10 डिसेंबर रोजी निर्णय देण्यात येईल.

न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर काही वेळातच राहुल गांधी यांनी ट्विटरवरून सरकारवर हल्ला चढवला. आपला आवाज बंद करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच त्यांच्या समर्थनासाठी जमलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांचे देखील त्यांनी आभार मानले.

आपली प्रतिक्रिया द्या