मोदी-गोडसे एकाच विचाराचे, राहुल गांधींचा घणाघात

342

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) गुरुवारी वायनाडमध्ये काढलेल्या ‘संविधान बचाव रॅली’त काँग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत खळबळजनक विधान केले. नरेंद्र मोदी आणि नथुराम गोडसे हे दोघे एकाच विचारसरणीचे आहेत. दोघांच्या विचारसरणीत कसलाच फरक नाही. मोदी यांची गोडसेवर श्रद्धा आहे हे सांगण्याची हिंमत त्यांच्यात नाही, असा घणाघाती हल्ला राहुल गांधींनी यावेळी केला.

हिंदुस्थानींना ते हिंदुस्थानचे नागरिक आहेत हे सिद्ध करावे लागत आहे. मी हिंदुस्थानी आहे हे ठरवणारे नरेंद्र मोदी कोण आहेत, कोण हिंदुस्थानी आहे आणि कोण नाही याचा निर्णय घेण्याचा परवाना मोदींना कोणी दिला आहे, असे सडेतोड सवाल राहुल यांनी उपस्थित केले. वायनाड लोकसभा मतदारसंघातील कलपेटा परिसरात संविधान बचाव रॅली काढण्यात आली. या रॅलीदरम्यान बोलताना राहुल यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला.

सीएए, एनआरसी नोकऱ्या देणार नाहीत!

देशातील बेरोजगारी आणि ढासळलेल्या अर्थव्यवस्थेच्या मुद्दय़ावरूनही राहुल यांनी पंतप्रधानांना टार्गेट केले. मोदींना बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेबाबत प्रश्न केला की, ते लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप त्यांनी केला. सीएए आणि एनआरसी आपल्याला नोकरी देणार नाहीत. आसाम आणि जम्मू-कश्मीरची स्थितीही रोजगार देणार नाही, असेही त्यांनी तरुणाईला सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या