
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी ठरवल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने आज हा निर्णय जाहीर केल्यानंतर देशभरात एकच खळबळ माजली. विरोधकांनी या निर्णयावरून केंद्र सरकार व भाजपवर टीका केली आहे. या कारवाईवर राहुल गांधी यांनी दोन वाक्यात प्रतिक्रीया दिली आहे.
राहुल गांधी यांनी ट्विटरवरून त्यांच्यावरील कारवाईवर प्रतिक्रीया व्यक्त केली. ”मी देशाच्या आवाजासाठी लढत आहे. त्यासाठी मी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे” अशा मोजक्या शब्दात त्यांनी प्रतिक्रीया दिली.
गुरुवारी राहुल गांधी यांना अब्रुनुकसानीच्या खटल्यात गुजरातमधील सुरत सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली. या शिक्षेनंतरही राहुल गांधी यांनी ट्विटरवरून मोजक्या शब्दात प्रतिक्रीया व्यक्त केली होती. ”माझा धर्म सत्य आणि अहिंसेवर आधारित आहे. सत्य माझा परमेश्वर आहे. अंहिसा त्याला मिळवायचे साधन – महात्मा गांधी’ असे ट्विट राहुल गांधी यांनी केले होते.
‘सर्व चोरांची आडनावे मोदी कशी असतात?’ असे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात केले होते. याप्रकरणी दाखल झालेल्या मानहानी खटल्यात गुजरातमधील सुरत जिल्हा व सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यानंतर तातडीने जामीन मंजूर केला आणि शिक्षेला 30 दिवसांची स्थगिती दिली आहे.