तो हल्ला म्हणजे राहुल गांधींच्या हत्येचा कट होता !

31

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी गुजरातमधील बनासकांठा इथे आलेल्या राहुल गांधी यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती. ही दगडफेक म्हणजे राहुल गांधी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न होता असा आरोप काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खरगे यांनी लोकसभेमध्ये केला. लोकसभेचं कामकाज सुरू होताच काँग्रेसने हा मुद्दा लावून धरण्याचा प्रयत्न केला. खरगे म्हणाले की भाजप सरकार म्हणतं की जम्मू-कश्मीरमध्ये दगडफेक करणारे हे दहशतवादी आहेत. मग गुजरातमध्ये दहशतवादी आले होते का ?, ते जम्मू कश्मीरमधून आले होते का ? का भाजप कार्यकर्ते दहशतवादी बनून राहुल गांधींना जीवे मारण्याचा प्रयत्न करत होते ? असे प्रश्न विचारत भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

खरगे यांच्या या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह उभे राहीले, त्यांनी या सगळ्या प्रकाराला राहुल गांधीच जबाबदार असल्याचं म्हटलं. राहुल गांधी यांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने योग्य ती खबरदारी घेतली होती. राहुल गांधींना त्यांच्या बुलेटप्रूफ गाडीत बसायला एसपीजीने सांगितले होते. मात्र तरीही ते साध्या गाडीत जाऊन का बसले असा सवाल सिंह यांनी विचारला. सिंह यांनी राहुल गांधी यांना प्रश्न विचारला की ते परदेशात जातात तेव्हा सुरक्षाव्यवस्था का घेऊन जात नाहीत , ते नेमकं काय लवपण्याचा प्रयत्न करत आहे ? या प्रश्नांनंतर काँग्रेसी खासदारांनी गोंधळ घालायला सुरूवात केली. ज्यामुळे काही काळासाठी लोकसभेचं काम तहकूब करावं लागलं होतं.

आपली प्रतिक्रिया द्या