काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळली

नागपूर – ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आल्याचे चित्र दिसत आहे. पक्षात राजी-नाराजीचे वारे वाहत आहे़. दरम्यान, नागपुरात प्रतिष्ठेची लढत असून निवडणुकीत सर्व नेत्यांना एकत्र येऊन काम करावे लागेल, अशी समज काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी नेत्यांना दिली.

काँग्रेसने नागपूर शहरासाठी निरीक्षक म्हणून खासदार हुसेन दलवाई यांची नियुक्ती केली आहे़. दलवाई शनिवारी (२१ जानेवारी) नागपुरात दाखल झाले. शनिवारी सकाळी पक्षाच्या शहर कार्यालयात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा मेळावाही पार पडला. यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना दलवाई म्हणाले, महापालिका निवडणुकीची तयारी काँग्रेसने सुरू केली आहे़. मेळावा आणि बैठका घेतल्या जात आहेत.

मुंबई, नागपूरसह अन्य ठिकाणी काँग्रेसची लढाई शिवसेना-भाजपाशी आहे. काँग्रेस यावेळी ताकदीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरेल. नागपुरातील काँग्रेस नेत्यांमध्ये गटबाजी असल्याच्या चर्चा निराधार आहेत. आगामी निवडणुकीत सर्वांना एकीनेच काम करावे लागेल़ शहरातील काँग्रेसचे नेते वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करणार असतील तर त्यात गैर काहीच नाही़. कार्यक्रम वेगवेगळे आयोजित केले म्हणजे, गटबाजी आहे, असे म्हणणे गैर असल्याचे दलवाई यांनी अधोरेखित केले. ते पुढे म्हणाले, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सर्वच नेत्यांना एकत्र येऊन काम करण्यासंदर्भात सुचना दिल्या आहेत. पक्षामध्ये सक्रीय असणाऱ्यांना व निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच उमेदवारी देण्यात येईल नागपुरात मुलाखीत आटोपल्यानंतर संसदीय मंडळ त्यावर निर्णय घेऊन १ फेब्रुवारी रोजी यादी जाहीर करेल. या निवडणुकीत काँग्रेसचे मताधिक्य वाढलेले दिसेल, असा विश्वासही दलवाई यांनी व्यक्त केला.

राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी होईल किंवा नाही, याबाबतचा निर्णय पक्षाच्या संसदीय मंडळात घेतला जाणार आहे़. राष्ट्रवादी काँग्रेसशी सन्मानाने आघाडी झाली तर होईल अन्यथा काँग्रेस स्वबळावर लढण्यासाठी तयार आहे़.दोन्ही पक्षात राज्य पातळीवर अजून चर्चा झालेली नाही़. येत्या २४ जानेवारी रोजी काँग्रेसच्या संसदीय मंडळाची बैठक होणार असून त्यात आघाडीबाबत चर्चा होईल. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर आघाडी करावी की नाही याबाबाबत बैठकीत चर्चा केली जाणार आहे. राज्यात सर्वच ठिकाणी आघाडी होईल की नाही, याबाबत काहीच सांगता येत नसल्याचे दलवाई यांनी नमूद केले.

आपली प्रतिक्रिया द्या