काँग्रेसची दिल्लीतील यादी जाहीर, 2014 ला झाला होता सुपडा साफ

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राजधानी दिल्लीमध्ये आम आदमी पक्षासोबत आघाडीची शक्यता माळवल्याने सोमवारी काँग्रेसने दिल्लीतील 7 पैकी 6 जागांवरील उमेदवारांची घोषणा केली. ईशान्य दिल्लीतून माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शीला दीक्षित यांचा सामना भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्यासोबत होणार आहे. तिवारी यांनी 2009 आणि 2014 मध्ये या मतदारसंघातून विजय मिळवलेला आहे. परंतु यंदा त्यांच्यासमोर माजी मुख्यमंत्र्यांचे आव्हान असल्याने येथे चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे आम आदमी पक्षाने येथून दिलीप पांडे यांना संधी दिली आहे.

ईशान्य दिल्लीतून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शीला दीक्षित म्हणाल्या की, ‘मी माझी जबाबदारी संपूर्ण ताकदीने निभावेल. येथून मी याआधीही निवडणूक लढली असल्याने लोकं मला ओळखतात. आम्ही मेट्रोची सुरुवात येथूनच केली होती. लोकांसाठी कामं करणे हिच आमची प्राथमिकता आणि कर्तव्य आहे.’

सलग तीन वेळा (1998 ते 2013) दिल्लीचे मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या शीला दीक्षित पहिल्यांदाच दिल्लीतून लोकसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरल्या आहेत. याआधी 1984 ला उत्तर प्रदेशमधील कन्नोज मतदारसंघातून खासदार झाल्या होत्या.

दरम्यान, सोमवारी काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी दिल्लीतील उमेदवारांची घोषणा केली. या यादीनुसार, चांदणी चौक मतदारसंघातून जेपी अग्रवाल, ईशान्य दिल्लीतून शीला दीक्षित, पूर्व दिल्लीतून अरविंदर सिंह लवली, नवी दिल्लीतून अजय माकन, वायव्य दिल्लीतून राजेश लिलोठिया आणि पश्चिम दिल्लीतून महाबल मिश्रा यांना उमेदवारी दिली आहे. दक्षिण दिल्लीतील उमेदवाराची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही.

2014 ला भाजपने ‘दिल्ली’ जिंकली होती
दरम्यान, 2014 ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीत सर्व जागा भारतीय जनता पक्षाने जिंकल्या होत्या. चांदणी चौक येथून हर्ष वर्धन, ईशान्य दिल्लीतून मनोज तिवारी, पूर्व दिल्लीतून महेश गिरी, नवी दिल्लीतून मीनाक्षी लेखी, वायव्य दिल्लीतून उदित राज, दक्षिण दिल्लीतून रमेश बिदूरी आणि पश्चिम दिल्लीतून प्रवेश वर्मा यांनी विजय मिळवला होता.