सेनापती सोडून पळाला; विधानसभा जिंकणार कशी?

948

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. परंतु त्यांनी अशा प्रकारे राजीनामा देऊन पळच काढला असून त्यांच्या राजिमान्यानंतर पक्षावरील संकट आणखी गडद झाले आहे. अनेक नेते सोडून गेले आहेत. हीच पक्षासमोरील मोठी समस्या असून महाराष्ट्र आणि हरयाणात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस जिंकण्याची शक्यता कमीच असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी म्हटले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसला अशा प्रकारे घरचा अहेर दिला आहे.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली सविस्तर मते मांडली आहेत. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या धक्क्यातून पक्ष अजूनही सावरलेला नाही. इतकेच नाही तर पक्षाला पराभव का स्वीकारावा लागला याबाबतचे आत्मपरीक्षण करण्यासाठी नेत्यांना एकत्रही येता आलेले नाही. त्यातच काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन राहुल यांनी पक्षाला आणखी मोठय़ा संकटात टाकल्याचा आरोपही त्यांनी केला. इतक्या घाईगडबडीत त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला नको होता, असेही ते म्हणाले. दरम्यान, सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली असली तरी त्या नव्या अध्यक्षाच्या प्रतीक्षेत आहेत. केवळ अध्यक्षपद रिक्त होते म्हणून त्या पदावर असल्याची त्यांची धारणा आहे, परंतु असे असू नये अशी मी आशा करतो असेही खुर्शीद यांनी म्हटले आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर नव्या अध्यक्षाचा विचार

पक्षाची सध्या अशी अवस्था झाली आहे की, पक्ष आपले भविष्यही ठरवू शकत नाही. आता आगामी विधानसभा निवडणुकांच्या रूपाने पक्षासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. महाराष्ट्र आणि हरयाणामधील विधानसभा निवडणूक झाल्यानंतर पक्षाच्या नव्या अध्यक्षाच्या नावाचा विचार केला जाणार असल्याचेही खुर्शीद यांनी सांगितले.

खुर्शीद यांच्यावर रशीद अल्वी भडकले

खुर्शीद यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे नेते रशीद अल्वी यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. पक्षाला बाहेरच्या दुष्मनांची गरजच नाही. पक्षातील नेते घरात आग लावण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा शब्दांत अल्वी यांनी खुर्शीद यांच्यावर तोफ डागली आहे. सध्या काँग्रेस संकटात सापडली असून सर्वांनी मिळून या परिस्थितीचा सामना करण्याची गरज असल्याचेही अल्वी यांनी म्हटले आहे.

काँग्रेसकडे ना नेता, नीती आणि नियत! – पात्रा

सलमान खुर्शीद यांनी राहुल गांधी यांच्यावर पळपुटेपणाचा आरोप केल्यानंतर भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले, ‘हरयाणा आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक आहे, मात्र आता काँग्रेसने विधानसभा निवडणुका लढण्याआधीच आपली हार स्वीकारली आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपद सोडले, सोनिया गांधी केवळ सांभाळायचे म्हणून हे पद कसेबसे सांभाळत आहेत. याचा अर्थ एकच होतो की, काँग्रेसकडे ना नेता आहे, ना नीती आणि नियत. त्यामुळे काँग्रेसला आता पराभवापासून कोणीही रोखू शकणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या