काँग्रेस खासदार राजीव सातव गडकरी वाड्यावर

18

सामना प्रतिनिधी । नागपूर

राज्यात काँग्रेस पक्षांतर्गत वातावरण तापले असतानाच मराठवाडय़ातील हिंगोलीचे काँग्रेस खासदार राजीव सातव यांनी शनिवारी दुपारी केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या वाड्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीत मराठवाडय़ातील विकासकामाबाबत व हिंगोलीच्या समस्येबाबत चर्चा झाली असल्याचे नितीन गडकरी आणि खासदार सातव यांनी सांगितले.

विदर्भातील नाराज असलेल्या काँग्रेस नेत्यांनी एकत्र येत दबावगट तयार करून हायकमांडकडे विदर्भ प्रदेश काँग्रेसची स्थापना करण्याची मागणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता प्रदेश काँग्रेसमध्ये उघड दोन गट पडल्याचे चित्र समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सातव यांनी गडकरींची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

खासदार सातव शनिवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमाराला गडकरींच्या नागपूर निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर अवघ्या काही वेळेत गडकरी एक कार्यक्रम अर्ध्यात सोडून घरी पोहोचले. या दोन्ही नेत्यांमध्ये बराचवेळ बंद दाराआड चर्चा झाली. मतदार संघातील समस्यांबाबत गडकरींची भेट घेतल्याचे सातव यांनी सांगितले.

कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथील बायपासचा सर्व्हे या अगोदर नागपूर ते तुळजापूर या महामार्गासाठी झाला. तेथील शेतकऱ्यांची जमीन संपादीत करण्यात आली असून, आता सुरू असलेल्या समृद्धी महामार्गासाठी पुन्हा दुसऱ्या बाजूने बायपास करण्यासाठी शेती संपादन करीत असल्याने संबधित शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे दोन्ही बायपास एकत्र करावे अशी विनंती करण्यासाठी आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र या मुद्यावर अगोदर दिल्लीतदेखील चर्चा झाली असताना सातव यांनी नागपूर कसे गाठले?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या संदर्भात नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की राजीव सातव आपल्या मतदारसंघातील समस्या घेऊन आले होते त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या