मोदी जगातील सर्वात महाग ‘चौकीदार’, काँग्रेसकडून पंतप्रधानांवर निशाणा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशातील बँकिंग क्षेत्रातील महाघोटाळ्यावरून काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधण्यात आला आहे. पीएनबी घोटाळ्यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी शनिवारी मोदींवर टीकास्त्र सोडले. एवढ्या मोठ्या घोटाळ्यावर मोदींकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. मोदी जगातील सर्वाधिक महाग ‘चौकीदार’ असल्याचा आरोप सिब्बल यांनी केला. सिब्बल यांच्याआधी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, राजद प्रमुख आणि चारा घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात असलेले लालूप्रसाद यादव आणि भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनीही मोदींचा चौकीदार असा उल्लेख करत हल्लाबोल केला होता.

‘पंतप्रधान आपल्या प्रत्येक भाषणामध्ये युपीए सरकारच्या कार्याकाळात १.७६ लाख कोटींचा टू.जी. घोटाळा झाल्याची बतावणी करत असतात, मात्र हा घोटाळा नव्हताच असे न्यायालयानेच स्पष्ट केले आहे, असे सिब्बल यांनी म्हटले. नीरव मोदीने केलेला ११, ३०० कोटी आणि रोटोमॅकच्या ३,००० कोटींच्या घोटाळ्याचा उल्लेख करत ही देशाची मोठी आर्थिक हानी असल्याचे सिब्बल यांनी म्हटले आहे. तसेच याप्रकरणी मोदी गप्प का आहेत? असा प्रश्नही त्यांनी पुन्हा विचारला आहे. देशाच्या पंतप्रधानांकडे एक घर आहे, विमान आहे. ते जगातील सर्वात महाग चौकीदार आहेत, असेही सिब्बल यावेळी म्हणाले.

याआधी शुक्रवारी इटी ग्लोबल बिजनेस समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना पीएनबी घोटाळ्यावर आपले मौन सोडले होते. आर्थिक क्षेत्रातल्या अनियमिततेवर सरकार कठोर कारवाई करत आहे आणि यापुढे करत राहील. आर्थिक अनियमिततेबाबत हे सरकार अत्यंत कठोर आहे. या अनियमिततेच्या आड कुणी जनतेचा पैसा हडप करणार असेल तर हे सरकार अजिबात सहन करणार नाही, असा इशारा पंतप्रधानांनी दिला होता.

वाचा – पीएनबी महाघोटाळा : पंतप्रधान मोदींनी सोडले मौन