2029 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने स्वबळावर लढण्याची तयारी करावी – जयराम रमेश

2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा सामना करण्यासाठी स्थापन झालेल्या कोणत्याही विरोधी आघाडीचा कणा काँग्रेसला व्हावं लागेल. काँग्रेसने 2029 ची लोकसभा निवडणूक प्रत्येक राज्यात स्वबळावर लढण्याची तयारी केली पाहिजे, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी व्यक्त केले. शनिवारी ‘पीटीआय-भाषा’ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

ते म्हणाले की, “आम्ही प्रत्येक राज्यामध्ये सत्तेत असू शकत नाही, परंतु प्रत्येक गावात, परिसरात, ब्लॉक आणि शहरात तुम्हाला काँग्रेसचे कार्यकर्ते आणि काँग्रेस कुटुंबे सापडतील. परंतु एखाद्या ठिकाणी जेव्हा मोठ्या संख्येने उपस्थितीचा विचार केला जातो तेव्हा तेथे काँग्रेस ही एकमेव राष्ट्रीय राजकीय शक्ती आहे”. “होय, आम्ही सर्वांचा आधार आहोत. आम्ही भाजपशी लढू. केवळ काँग्रेसभोवती तयार झालेली आघाडीच भाजपला टक्कर देऊ शकते”. रमेश यांच्या म्हणण्यानुसार, काँग्रेसने एकट्याने भाजपशी मुकाबला करावा.

पुढे ते म्हणाले की. ‘भारत जोडो यात्रा’ संपल्यानंतर गुजरातमधील पोरबंदर ते अरुणाचल प्रदेशातील परशुरामपूर कुंडापर्यंत आणखी एक यात्रा काढण्याचा आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. परंतु शेवटी पक्षाला याचा निर्णय घ्यावा लागेल. पक्ष ही यात्रा काढेल की नाही हे मी सांगू शकत नाही. परंतु मी याचा नक्कीच विचार करत आहे. उदयपूरमध्ये चिंतन शिबिरात ‘भारत जोडो यात्रे’ची चर्चा झाली, तेव्हा पश्चिमेकडून पूर्वेकडे यात्रा करण्याचा विचार होता.