सिंधुदुर्ग काँग्रेस खजिनदार शशांक मिराशी यांना अटक

सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्ग

देशी दारू परवाना विक्री प्रकरणात ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे नवनियुक्त खजिनदार शशांक मिराशी यांना मिरारोड पोलिसांनी सोमवारी मुंबईत अटक केली. मिराशी यांना न्यायालयाने २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मिराशी यांची सासू नीता पांगे यांच्या नावे असलेला देशी दारुचा परवाना हिरवाणी नावाच्या व्यक्तीस विकण्याचा व्यवहार ५२ लाख रुपयांत झाला. त्यापैकी ४० लाख रुपये पांगे यांना देण्यात आले. व उर्वरित १२ लाख रुपयांची रक्कम परवाना नावावर झाल्यानंतर मिळणार होती. मात्र नीता पांगे व शशांक मिराशी यांनी परवाना आपल्या नावावर न करता प्रशांत शेट्टी यांना विकले, अशी तक्रार हिरवाणी यांनी नयानगर पोलीस ठाण्यात दिली. तक्रार दाखल झाल्यानंतर शशांक मिराशी यांना अटक करण्यात आली आहे.

१५ दिवसांपूर्वीच काँग्रेस खजिनदार म्हणून नियुक्ती

कट्टर काँग्रेस कार्यकर्ते असलेल्या शशांक मिराशी याची प्रदेश कॉंग्रेसने नव्याने जाहीर झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या खजिनदारपदी नियुक्ती केली होती. मिराशी याच्या अटकेमुळे काँग्रेसच्या वर्तुळातही खळबळ उडाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या