मुख्यमंत्र्यांची ‘मित्रा’साठी सरकारी तिजोरीतून कोटय़वधींची उधळपट्टी, विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक आरोप

सर्वसामान्यांचे सरकार अशी बिरुदावली मिरवत मिंधे सरकारची सरकारी तिजोरीतून स्वार्थासाठी उधळपट्टी सुरू आहे. त्यात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका खासगी मित्राचीही भर पडली आहे. सामान्य जनतेचे कोटय़वधी रुपये त्यांनी या ‘मित्रा’वर उधळले आहेत.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विटरवरून मुख्यमंत्री शिंदे यांच्या या उधळपट्टीची पोलखोल केली आहे. राज्याच्या विकासासाठी नीती आयोगाच्या धर्तीवर मिंधे सरकारने ‘मित्र’ संस्थेची स्थापना केली. या संस्थेवर मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या मित्राची वर्णी लावली असून आता या मित्राला बसण्यासाठी कोटयवधी रुपये सरकारी तिजोरीतून देऊन ऐसपैस कार्यालयही देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अडीच कोटींची उधळण

नवीन प्रशासकीय भवनात ‘मित्र’ संस्थेला जागा दिली गेली होती. आता ती जागा कमी पडत असल्याचे सांगत या संस्थेचे कार्यालय नरीमन पॉईंट येथील निर्मल भवनमध्ये स्थानांतरीत केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या मित्राच्या नवीन कार्यालयासाठी सरकार महिन्याला 21 लाख रुपये म्हणजे वर्षाला 2 कोटी 56 लाख रुपय भाडे देणार असून ही सरकारी पैशांची उधळपट्टी आहे, असे वडेट्टीवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, महायुती सरकारची ही एक आणखी नवीन स्कीम आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.