राजस्थानात कमळ कोमेजले, काँग्रेसचा भाजपवर दणदणीत विजय

14

सामना ऑनलाईन । जयपूर/कोलकाता

राजस्थान, पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभेच्या दोन व लोकसभेच्या तीन पोटनिवडणुकांत भाजपचा पार धुव्वा उडाला. या पाचपैकी तीन जागांवर काँग्रेसने कब्जा केला असून दोन जागा तृणमूल काँग्रेसच्या खात्यात गेल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये डाव्यांचा उरलासुरला पालापाचोळाही या निवडणुकीत उडाला.

राजस्थानातील अजमेर येथील लोकसभा सदस्य सांवरलाल जाट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली. अलवर लोकसभा मतदारसंघाचे खासदार महंत चांदनाथ यांच्या निधनामुळे ही जागाही रिक्तच होती. मांडलगडच्या आमदार कीर्तिकुमारी यांच्या निधनामुळे येथेही पोटनिवडणूक घेण्यात आली. अजमेर येथे काँग्रेसचे रघू शर्मा यांनी भाजपचे रामस्वरूप लांबा यांना २० हजार ६४८ मतांनी धोबीपछाड दिली तर अलवर येथे भाजपचे जसवंतसिंह यादव यांचा काँग्रेसचे करण सिंह यांनी ४० हजार मतांनी दणदणीत पराभव केला. मांडलगड येथे मात्र काँग्रेस व भाजपमध्ये जोरदार सामना झाला, परंतु शेवटच्या टप्प्यात काँग्रेसचे विवेक धाकड यांनी भाजपचे शक्तिसिंग हाडा यांना १२ हजार मतांनी अस्मान दाखवले. राजस्थानातील या निकालांनी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या साम्राज्याला जबर हादरा दिला आहे. काँग्रेस नेते सचिन पायलट यांचा या विजयात मोलाचा वाटा आहे.

पश्चिम बंगालमध्ये डाव्यांचा पाचोळा
पश्चिम बंगालमध्ये उलुबेरिया लोकसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार सजदा अहमद यांनी ४ लाख ७० हजार मतांची आघाडी घेऊन दणदणीत विजय मिळवला. तृणमूलचे खासदार सुल्तान अहमद यांच्या निधनामुळे उलुबेरियात तर काँग्रेसचे आमदार मधुसूदन घोष यांच्या निधनामुळे नुआपाडा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली. नुआपाडा विधानसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे सुनील सिंह यांनी जवळपास सव्वा लाख मतांनी विजय मिळवला. ही जागा तृणमूलने काँग्रेसकडून हिसकावली. येथे माकपच्या गार्गी चटर्जी, भाजपचे संदीप बॅनर्जी व काँग्रेसचे गौतम बोस यांना मात देऊन त्यांनी विधानसभेत प्रवेश मिळवला.

आपली प्रतिक्रिया द्या