गोरेगावच्या जिगरबाज कॉन्स्टेबलचे कौतुक

आपल्या जिवाची बाजी लावून गोरेगाव रेल्वे प्लॅटफॉर्मवर चालत्या ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकलेल्या एका प्रवाशाचे प्राण वाचवणाऱ्या जिगरबाज कॉन्स्टेबल बाळासो ढगे यांचे नुकतेच पोलीस दलाकडून कौतुक करण्यात आले आहे.

गोरेगाव रेल्वे प्लॅटफॉर्मवर 29 ऑगस्ट रोजी रात्री सव्वाआठच्या सुमारास ही घटना घडली होती. एका प्रवाशाने चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला, परंतु ट्रेनमध्ये चढताना त्याचा तोल गेला आणि तो प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधील गॅपमध्ये अडकला. तेवढय़ात डय़ुटीवरून घरी परतणाऱ्या गोरेगाव पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल बाळासो ढगे यांनी तत्काळ त्या प्रवाशाकडे धाव घेत त्याला सुखरूपरीत्या बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सने जिगरबाज पोलीस बाळासो ढगे यांच्या शौर्याचे कौतुक केले. मुंबई पोलिसांनीदेखील या घटनेचा व्हिडीओ शेअर करत ढगे यांचे कौतुक केले होते.

नुकताच अपर पोलीस आयुक्त राजीव जैन यांच्या हस्ते  कॉन्स्टेबल बाळासो ढगे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस उपायुक्त आनंद भोईटे आणि प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुसूदन नाईक हेदेखील उपस्थित होते.