निष्काळजीपणासाठी दीपक रुग्णालयाला अडीच लाख रुपयांचा दंड

590

अपघातग्रस्त रुग्णावर शस्त्रक्रियेच्यावेळी निष्काळजीपणा केल्याबद्दल जालना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने  दीपक रुग्णालयालाला दणका देत अडीच लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

जाफ्राबाद पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी गजानन शामराव कायंदे यांच्या दुचाकीला 9 मे 2015 रोजी अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना दीपक रुग्णालयालामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या उजव्या कमरेच्या पायामधील भाग अर्थात हिप जॉईंट निकामी झाल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्याय नसल्याचे रुग्णालयालामधील डॉ. शिवाजी मुंढे यांनी सांगितल्याने त्यांच्या सल्ल्यानुसार कायंदे यांनी शस्त्रक्रियेस संमती दिली. त्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात आली. ती यशस्वी झाल्याचे डॉ. मुंढे यांनी सांगितले. त्यानंतर कायंदे यांनी नियमित उपचार घेतला. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी फिजीओथेरपी घेण्याबाबत कोणतेही मार्गदर्शन केले नाही. त्यामुळे ही शस्त्रक्रिया काही दिवसानंतर अयशस्वी झाली. जखमेच्या ठिकाणी संक्रमण झाल्यामुळे त्यांना बराच मानसिक, शारिरीक, आर्थिक त्रास सहन करावा लागला. त्यानंतर अधिक उपचारासाठी सन 2016 मध्ये पुणे येथील संचेती रुग्णालय गाठले. तपासणीअंती त्यांना समजले की, पुर्वीची शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याने जखमेच्या ठिकाणी संक्रमण झाले आहे. संक्रमण पूर्णपणे गेल्याशिवाय जखमेच्या ठिकाणी पुन्हा शस्त्रक्रिया करुन हीप जॉईंट टाकणे अशक्य असल्याचे संचेती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे कायंदे यांना धक्का बसला असून, अद्यापी त्यांच्या जखमेच्या भागातील संक्रमण कमी न झाल्याने शस्त्रक्रिया होऊ शकली नाही. परिणामी त्यांना वॉकरशिवाय चालणे अशक्य आहे. दीपक हॉस्पिटलच्या निष्काळजीपणाने आर्थिक, शारिरीक, मानसिक हानी झाल्याने कायंदे यांनी अ‍ॅड. गजानन मांटे यांच्यामार्फत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात धाव घेऊन तक्रार नोंदविली होती. मंचाने दोन्ही बाजूचे म्हणणे विचारात घेऊन समोर आलेल्या पुराव्यावरुन दीपक हॉस्पिटलने तक्रारदार गजानन कायंदे यांना अडीच लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.

आपली प्रतिक्रिया द्या