चंद्रपुरकरांचं आरोग्य धोक्यात! नदीत सोडलं दूषित पाणी, महापालिकेकडून पाणीपुरवठा बंद

Contaminated-water

 

चंद्रपूर शहराची जलवाहिनी इरई नदीमध्ये प्रदूषित पाणी सोडण्यात आल्यानं चंद्रपूर शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. या प्रकारामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणाची भीषणता पुन्हा एकदा उघड झाली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून इरई नदीत मोठ्या प्रमाणात प्रदूषित पाणी येत असल्याने चंद्रपूर महानगरपालिकेने दाताळा येथील इंटेक वेल (intake well) बंद केली. त्यामुळे चंद्रपूर शहरातील 40 टक्के भागाचा पाणीपुरवठा कालपासून बंद आहे. या दूषित पाण्यामुळे इरई नदीचे पाणी अतिशय प्रदूषित झाल्यानं ते स्वच्छ करणे शक्य नाही. यामुळे पाणीपुरवठा बंद केल्याची मनपा आयुक्तांनी माहिती दिली.

तर दुसरीकडे इरईमध्ये सोडण्यात आलेलं प्रदूषित पाणी चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनने सोडल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी केला आहे. बेले यांच्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आज घटनास्थळ गाठत तपास सुरू केला असून पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले. नदीमध्ये ज्यांनी हे दूषित पाणी सोडले त्यांच्यावर आता फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.